संवाद ही केवळ माणसांपुरती मर्यादित संकल्पना नाही. प्राणी, पक्षी, झाडे आणि अगदी सूक्ष्मजीवही एकमेकांशी संवाद साधतात. जीवाणूंमध्ये होणाऱ्या संवादाला क्वोरम सेन्सिंग असे म्हणतात. या प्रक्रियेत, जीवाणू स्वत:च्या संख्येच्या आधारे रासायनिक रेणूंमार्फत एकमेकांशी संवाद साधत सामूहिक कृती करतात. हा संवाद स्वयंप्रेरक (ऑटोइंड्यूसर) नावाच्या रसायनांमुळे घडतो. जीवाणू स्वयंप्रेरक तयार करून आजूबाजूच्या वातावरणात सोडतात. हे रसायन पेशीबाहेर साचत राहते. एक ठरावीक मर्यादा गाठली की स्वयंप्रेरक पेशीबाहेर जाणे थांबते आणि पेशींमध्ये साठू लागते. या रसायनामुळे समूहातील सर्व पेशींतील काही जनुके एकाच वेळी सक्रिय होतात व त्या पेशी सामूहिकपणे कृती करतात, जसे- जीवदीप्ती दर्शविणे (प्रकाश उत्सर्जित करणे), विष तयार करणे किंवा बायोफिल्म तयार करणे, इत्यादी.

क्वोरम सेन्सिंग ही संकल्पना प्रथम १९७० साली वुडी हेस्टिंग्स आणि कॅनेथ नील्सन यांनी मांडली. पुढे एनेरेट पिटर ग्रीनबर्ग यांनी २००५च्या सुमारास त्याचे प्रारूप निश्चित केले. समुद्रात आढळणाऱ्या व्हिब्रिओ फिशेरी या ग्राम निगेटिव्ह जीवाणूंमध्ये एक विशिष्ट संख्येचा टप्पा पार केल्यावरच जीवदीप्ती झाल्याचे दिसून आले. यावरून असे लक्षात आले की जीवदीप्ती दर्शविण्यासाठी व्हिब्रिओ फिशेरीला विशिष्ट संख्याबळाची आवश्यकता असते. यासाठी ते स्वयंप्रेरकाच्या पातळीवरून स्वत:च्या संख्येचा अंदाज घेतात. हे अगदी ग्रामसभेत संख्याबळाच्या आधारे एखादा ठराव मंजूर करण्यासारखे आहे.

ग्राम निगेटिव्ह जीवाणू अॅसिल होमोसेरिन लॅक्टोन नावाचे स्वयंप्रेरक तयार करतात. तर ग्राम पॉझिटिव्ह जीवाणू पेप्टाइड्सपासून बनलेले स्वयंप्रेरक वापरतात. फ्युरानोसिल बोरेट हे स्वयंप्रेरक दोघेही तयार करतात. काही जीवाणू फक्त स्वत:चे संकेत ओळखतात, तर काही इतरांचेही संकेत समजून प्रतिसाद देतात. त्यामुळे त्यांच्यात कधी स्पर्धा, तर कधी सहकार्य दिसते. क्वोरम सेन्सिंगच्या माध्यमातून जीवाणू त्यांच्या रोगकारक क्षमतेसाठी आवश्यक अशा विषारी घटकांचे उत्पादन नियंत्रित करतात. उदाहरणार्थ, विब्रिओ कॉलरी (कॉलराचा जीवाणू) क्वोरम सेन्सिंगचा वापर करून आतड्यांमध्ये बायोफिल्म तयार करतो. ही बायोफिल्म त्याला पक्कं स्थिर व्हायला मदत करते आणि त्यामुळे रोगाची तीव्रता वाढते. दुसरीकडे, आतड्यांमध्ये राहणारा लॅक्टोबॅसिलस नामक लाभदायक जीवाणू स्टॅफिलोकोकस ऑरियसच्या (अन्न विषबाधा करणारा जीवाणू) क्वोरम सेन्सिंगमध्ये अडथळा निर्माण करतो. त्यामुळे स्टॅफिलोकोकस एकमेकांशी संवाद साधू न शकल्यामुळे आतड्यांमध्ये पसरू शकत नाहीत. स्यूडोमोनास एरुजिनोसा सारखे जीवाणू क्वोरम सेन्सिंगचा वापर करून पेशींना हानी पोहचवणारे घटक तयार करतात. यामुळे संसर्ग तीव्र होतो आणि उपचार कठीण होतात.
डॉ. विनायक सुतार
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org