डॉ. माधवी ठाकूरदेसाई
वेदनेचा अनुभव आपण सगळ्यांनी कधी ना कधी तरी घेतलेलाच असतो. आपल्याला जाणवणार्‍या वेदनेची निर्मिती जरी शरीरातल्या ऊतींना कोणत्यातरी कारणाने इजा झाल्यामुळे होत असली तरी वेदनेची जाणीव मात्र आपल्याला मेंदूमुळेच होते. शरीरात वेदना निर्माण होण्याची प्रक्रिया अत्यंत अचूक आणि जलद असते. आपल्याला वेदना व्हायला लागल्या की आपण वेदनाशामक औषधं घेतो आणि आपली वेदना थांबते.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या प्रकारची वेदनाशामक औषधं वापरत असतो. समजा आपला पाय घोट्याजवळ मुरगळला तर तिथल्या ऊतींना इजा होते आणि तिथे सूज येऊन आपल्याला दुखायला लागतं. याचं कारण म्हणजे जिथे इजा झाली त्या भागात ‘प्रोस्टाग्लँडिन्स’सारख्या एखाद्या रसायनाचा स्त्राव सुरू होतो. हे रसायन वेदनाग्राही मज्जातंतूंना अधिक संवेदनशील बनवतं आणि एक विद्युत संदेश मेंदूपर्यंत जातो. यानंतर आपला मेंदू वेदना निर्माण करून आपल्या शरीराला इजा झाल्याची सूचना देतो. यालाच आपण घोटा दुखायला लागला असं म्हणतो. अशा वेळी आपल्याला ‘आयबुप्रोफेन’ किंवा ॲस्परीनसारखी वेदनाशामक औषधं घ्यायला सांगितली जातात. ही औषधं घोट्याजवळ तयार होणार्‍या प्रोस्टाग्लँडिन्सची निर्मिती कमी करून वेदना आणि सूज कमी करतात.

कधीकधी ताप आल्यामुळे आपलं डोकं दुखतं. अशावेळी आपण क्रोसिनसारखी पॅरासिटेमॉल घेतो. पॅरासिटेमॉल थोड्या वेगळ्या प्रकाराने काम करतं. पॅरासिटेमॉल मुख्यत: मेंदूतील वेदना आणि ताप नियंत्रित करणार्‍या यंत्रणेवर परिणाम करतं आणि आपल्याला आराम पडतो. कर्करोगासारख्या आजारात मात्र संबंधित रुग्णाला कमालीच्या तीव्र वेदना होतात. त्यावेळी मॉर्फीनसारखी वेदनाशामक औषधं दिली जातात. ही औषधं थेट आपल्या मज्जासंस्थेवरच परिणाम करतात आणि त्यामुळे मेंदूला वेदनेचे संदेश मिळतच नाहीत आणि साहजिकच वेदनेची जाणीव नाहीशी होते.

थोडक्यात काय तर शरीरात नेमक्या कशामुळे वेदना निर्माण झाली आहे याचा तपास केला जातो आणि योग्य असतील ती वेदनाशामक औषधं आपल्याला दिली जातात. वेदनाशामक औषधं अतिशय उपयुक्त असली तरी त्यांचा अतिवापर आरोग्याला घातक असतो. ती घेतल्यावर रुग्णाच्या जळजळ होणं, भूक न लागणं, उलटी होईल असं वाटणं अशा तक्रारी सुरू होतात. खूप जास्त काळ जर वेदनाशामक औषधं घेतली गेली तर मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळा येतो. यकृताला हानी पोहोचू शकते, रक्तबिंबिका (प्लेटलेट) कमी होतात, ्त्रिरयांमध्ये मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो. आतड्याच्या आतल्या बाजूला जे मुलायम अस्तर असतं त्याला इजा होऊन ‘अल्सर’ होऊ शकतो. त्यामुळे वेदनाशामक औषधं जादू केल्यासारखी आपल्या वेदना नाहीशी करत असली तरी ती एका मर्यादेत घेणंच योग्य असतं.
डॉ. माधवी ठाकूरदेसाई
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org