वेगाने वारा वाहू लागतो, ढगांचा गडगडाट होतो, त्यात धूळ, पाऊस, गारा यापैकी काही किंवा सर्वच गोष्टींचा अंतर्भाव होतो, त्याला ‘वादळ’ म्हणतात.

हवेचा दाब, तापमान आणि आर्द्रता यामध्ये जेव्हा मोठा फरक निर्माण होतो, तेव्हा हवेत वेगाने हालचाल होते आणि वादळ तयार होतं. मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस किंवा गारपीट करणारं वादळ, कोरड्या प्रदेशात वार्‍यामुळे धूळ उडवणारं धुळीचं वादळ, थंड प्रदेशात जोरदार वार्‍यांसह बर्फवृष्टी करणारं हिमवादळ आणि उष्णकटिबंधीय क्षेत्रातलं समुद्रावर तयार होणारं चक्रीवादळ, हे सगळे वादळांचे प्रकार आहेत. या सर्वांमध्ये चक्रीवादळं जास्त विध्वंसक असतात.

कर्कवृत्त आणि मकरवृत्त यामधल्या क्षेत्रावर म्हणजे उष्णकटिबंधीय क्षेत्रावर वादळं निर्माण होण्यास अनुकूल परिस्थिती असते. जास्त उष्णतेमुळे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन पोकळी तयार होते आणि इतर भागांतली हवा या कमी दाबाच्या क्षेत्राकडे खेचली जाते. पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याने या हवेला गती मिळते. इतर भागांतली हवा कमी दाबाकडे सरळ न जाता, चक्राकार फिरत राहते. कमी दाबाकडे जाणारी हवा समुद्रावरचं बाष्प घेऊन जाते. मध्यभागी पोकळी व भोवती फिरणारे बाष्पयुक्त वारे, यामुळे भोवर्‍यासारखं वादळ तयार होतं. यालाच चक्रीवादळ म्हणजेच ‘सायक्लॉन’ म्हणतात. 

हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर आणि ऑस्ट्रेलियाचा समुद्र इथे मोठ्या प्रमाणात चक्रीवादळं निर्माण होतात. हिंदी महासागरातल्या वादळांना ‘सायक्लॉन’, अटलांटिक महासागरातल्या वादळांना ‘हरिकेन’ तर प्रशांत महासागरातल्या वादळांना ‘टायफून’ म्हणतात.

समुद्रावरून पुढे सरकताना या वादळांच्या ऊर्जेत वाढ होऊन, ती विस्तारतात आणि अधिक तीव्रही होतात. त्यामुळे त्यांचा पुढे सरकण्याचा वेग वाढतो. या वादळांचा वेग ताशी ५० ते २०० किलोमीटर, व्याप्ती १०० ते हजार किलोमीटर आणि उंची दहा ते १५ किलोमीटर असते. २०० किलोमीटरच्या पुढे वेग असलेल्या चक्रीवादळाला ‘सुपर सायक्लॉन’ म्हणतात. ही चक्रीवादळं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.

चक्रीवादळं भारतीय हवामानाचा महत्त्वाचा भाग आहेत. भारतात र्नैऋत्य मोसमी पावसापू्र्वी आणि मोसमी पावसानंतर चक्रीवादळं निर्माण होतात. मोसमी पावसापूर्वीची वादळं कमी प्रमाणात असतात. पावसाळ्यानंतर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातली वादळं भारताच्या पूर्व व पश्चिम किनार्‍यावर येऊन धडकतात.

जागतिक हवामानशास्त्र संघटनेच्या म्हणजेच ‘वर्ल्ड मिटिऑरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वादळांच्या प्रदेशातले देश सुपर सायक्लॉनला नावं सुचवतात आणि त्यातलं एक नाव त्या वादळाला दिलं जातं.

– अनघा शिराळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org