डॉ. रेणुसिंह-मोकाशी
आपण सजीव आणि निर्जीव वस्तूंच्या लांबीचे मोजमाप पट्टी किंवा मीटरटेपच्या साहाय्याने करत असतो; परंतु डोळ्यांनाही न दिसणाऱ्या अशा सूक्ष्मजीव किंवा वस्तूंचे मोजमाप करण्यासाठी मायक्रोमेट्री म्हणजेच सूक्ष्म अंतर मोजण्याचे साधन वापरावे लागते. ते मोजण्यासाठी मिलिमीटरपेक्षाही लहान असे ‘मायक्रॉन’ हे एकक वापरतात. १ मायक्रॉन म्हणजे एक मीटरचा दहा लाखावा भाग. आपल्या डोळ्यांना १०० मायक्रॉनपेक्षा लहान वस्तू दिसू शकत नाही. विषाणूंसारखे सूक्ष्मजीव १ मायक्रॉनपेक्षाही आकाराने लहान असतात. त्यांचे मोजमाप करण्यासाठी मिलीमायक्रॉन किंवा नॅनोमीटर ही एकके वापरतात.
अशा या सूक्ष्मजीवांच्या म्हणजे बॅक्टेरिया, बुरशीचे बीजाणू, यीस्ट, एकपेशीय प्राणी, शैवाल यांच्या लांबी, रुंदी, व्यास अशा मोजमापनासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शक यंत्र वापरतात; तर विषाणूंसाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यंत्र वापरतात. संयुक्त सूक्ष्मदर्शक यंत्रात ‘नेत्रभिंग’ आणि वस्तुभिंग’ अशी दोन भिंगे असतात. आपण ज्याला डोळा लावून बघतो, त्यास नेत्रभिंग (ऑक्युलर) आणि नमुन्याच्या काचपट्टीजवळील जे भिंग असते, त्यास वस्तुभिंग (ऑब्जेक्टिव) म्हणतात.
सूक्ष्मजीवांची लांबी मोजताना रेखांकित नेत्रभिंग (ऑक्युलर मायक्रोमीटर) बसवले जाते. एक रेखांकित काचपट्टी (स्टेज मायक्रोमीटर) घेऊन ती सूक्ष्मदर्शकाच्या मंचावरती वस्तुभिंगाच्या खाली ठेवतात. यात दोन रेषांमधील अंतर १० मायक्रॉन असते. कमी वर्धन क्षमतेचे वस्तुभिंग स्टेजवरील रेखांकित काचपट्टीवरती केंद्रित करतात. ऑक्युलर मायक्रोमीटरवरील रेखांकन आणि स्टेज मायक्रोमीटरवरील रेखांकन एकमेकांवरती प्रतिबिंबित होतील, अशा रीतीने ठेवतात.
ऑक्युलर मायक्रोमीटर आणि स्टेज मायक्रोमीटरवरील कुठली तरी एक रेषा प्रथम एकमेकांशी जुळवून घेतात. त्यानुसार दोन्ही मायक्रोमीटरवरील रेषा विभागांचे गुणोत्तर निश्चित करता येते. उदा. १० ऑक्युलर रेषा विभाग = २ स्टेज रेषा विभाग = २० मायक्रॉन, असे असेल तर १ ऑक्युलर रेषा विभाग = २ मायक्रॉन निश्चित होते. त्यानंतर स्टेज मायक्रोमीटर काढून मंचावरती प्रत्यक्ष सूक्ष्मजंतूंची काचपट्टी ठेवतात. ती ‘ऑइल इमर्शन ऑब्जेक्टिव’खाली केंद्रित करतात.
एक सूक्ष्मजीव ऑक्युलर मायक्रोमीटरवरील किती रेषाविभागांना व्यापतो; त्याचे निरीक्षण करतात. समजा, तो ६ रेषा विभागांना व्यापत असेल आणि प्रत्येक रेषाविभागातील अंतर जर २ मायक्रॉन असेल तर सूक्ष्मजीवाची लांबी ६ x २ = १२ मायक्रॉन इतकी असेल. याच पद्धतीने सूक्ष्मजीवाची रुंदी किंवा व्यासदेखील मोजता येतो.
डॉ. रेणुसिंह-मोकाशी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org