समुद्राच्या, नदीच्या किंवा डोहाच्या पाण्यामध्ये भोवरा तयार झाल्याचं आपण ऐकलं असेल किंवा पाहिलंही असेल. नदी-समुद्राचं जाऊदे, अगदी घरातसुद्धा कधी बेसिनमध्ये पाण्याचा भोवरा तयार होतो, तर कधी चमचा फिरवताना, चहाच्या कपातही एक छोटासा भोवरा तयार होतो.

बेसिनमध्ये तयार झालेल्या पाण्याच्या भोवर्‍याचं निरीक्षण केलं असता, काही गोष्टी जाणवतात. कचरा अडकल्यामुळे बेसिनमध्ये साठलेलं पाणी, कचरा निघाल्याबरोबर गोलाकार फिरतं आणि तिथे पाण्याचा भोवरा तयार झालेला दिसतो. त्यातही बेसिनच्या भोकाजवळ पाणी जास्त वेगाने फिरत भोकामध्ये जाताना दिसतं.

जेव्हा कुठल्याही पदार्थाला वर्तुळाकार गती असते आणि ती वर्तुळाच्या मध्याच्या दिशेने असते, तेव्हा वर्तुळाच्या मध्याजवळ ही गती बाहेरच्या गतीपेक्षा जास्त असते. काही कारणाने पाणी जेव्हा वर्तुळाकार फिरायला लागतं, तसतशी त्याचीही गती केंद्रबिंदूजवळ वाढत जाते. असं वर्तुळाकार फिरत जाणारं पाणी नरसाळ्यासारखा आकार धारण करतं. या नरसाळ्याच्या आकाराच्या सगळ्यात खोलवर जागी पाण्याचा थर विरळ असतो. कारण वेगवान वर्तुळाकार गतीमुळे, थोडं पाणी बाहेरच्या दिशेने फेकलं जातं. त्यामुळे बाहेरच्या बाजूच्या पाण्याचे दाट थर, पण केंद्रस्थानी मात्र पाण्याचे विरळ थर अशी परिस्थिती होते. परिणामी केंद्रस्थानी पाण्याचा दाब कमी आणि बाहेरच्या बाजूला फिरणार्‍या पाण्याचा दाब जास्त झाल्यामुळे, साहजिकच बाहेरचं पाणी केंद्राजवळच्या पाण्याला जोरात ढकलतं आणि म्हणून पाण्याच्या नरसाळ्याच्या खोल भागाजवळ, पाण्याची गती जास्त असते. जसजशी ही पाण्याची गती वाढत जाते, तसतसा हा नरसाळ्याचा आकार आणखी खोलवर होऊ लागतो. थोडक्यात पाण्याचा भोवरा प्रचंड वेगाने केंद्रस्थानी फिरत असतो.

फिरता फिरता, हा पाण्याचा फिरणारा भोवरा जर आजूबाजूला कुठे आपटला किंवा इतर काही कारणांमुळे त्याच्या गतीत व्यत्यय आला तर त्याची गती कमी होत जाते आणि हळूहळू हा भोवरा नाहीसा होतो.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जर या फिरणार्‍या भोवर्‍यामध्ये एखादा पदार्थ अडकला तर तो भोवर्‍याच्या गतीबरोबर फिरतफिरत नरसाळ्यासारख्या खोलवर भागामध्ये जातो. तिथं तळाला स्पर्श झाल्यावर आणखी खाली जाऊ शकत नसल्यामुळे तिथलं पाणी पसरायला लागतं आणि वर्तुळाकार गतीमुळे हळूहळू बाहेच्या बाजूने पसरत परत वरती आणि बाहेरच्या बाजूने जायला लागतं. साहजिकच पाण्यात अडकलेली ती वस्तूही हळूहळू वरच्या दिशेने फिरत, तळाकडून बाहेर येऊ लागते.

एखाद्या ग्लासमध्ये जोरात पाणी फिरवून, एखादा दाणा त्या भोवर्‍याच्या गतीनुसार कसा वरखाली प्रवास करतो हे पाहता येतं आणि पाण्याच्या भोवर्‍याचं विज्ञान अनुभवता येतं!