सकाळच्या नाश्त्यात इडली आणि डोसा या दाक्षिणात्य पदार्थांना हल्ली सर्वांची पसंती असते. मात्र या पदार्थाचं पीठ तयार करण्यासाठी बराच वेळ आधी तयारी करावी लागते. इडलीसाठी शक्यतो उकडा तांदूळ वापरला जातो. भाताच्या दाण्यांवरचं बाहेरचं आवरण न काढता तो भिजवतात, वाफवतात आणि वाळवून साठवतात. असं केल्यामुळे तांदळाच्या दाण्याच्या आवरणातले पौष्टिक घटक तांदळाच्या दाण्यात उतरतात. असा उकडा तांदूळ पौष्टिक आणि पचायला हलका होतो. तांदूळ आणि उडीद डाळ हे दोन जिन्नस ६-७ तास, वेगवेगळे भिजवतात. नंतर मिक्सरवर अथवा रगड्यावर एकत्र वाटतात. हे मिश्रण ८ ते १० तास भिजवून ठेवतात.

ही सगळी प्रक्रिया रंजक आहे. या मिश्रणासाठी उडीद डाळच का घेतात, हे आधी समजून घेऊ या. उडीद डाळ हे काही सूक्ष्मजीवांचं वसतिस्थान आहे. प्रामुख्याने लॅक्टिक आम्ल तयार करणारे, ल्युकोनॉस्टॉक मेसेंनटेरॉइडस, स्ट्रेप्टोकोकोस आणि लॅक्टोबॅसिलस जातीचे सूक्ष्मजीव या डाळीवर राहतात. डाळीतली कर्बोदकं आणि प्रथिनं यांवर त्यांची वाढ होते. कोरड्या डाळीवर त्यांची संख्या कमीच असते. पण पाण्यामध्ये मात्र त्यांची वाढ अधिक जलद गतीने होते.

तांदूळ आणि डाळ यांच्या मिश्रणात वाढताना, हे सूक्ष्मजीव, अमायलेझ आणि प्रोटिनेज ही विकरं निर्माण करतात. त्यामुळे मिश्रणातल्या, कर्बोदकं म्हणजेच पिष्टमय पदार्थ आणि प्रथिनांचं रूपांतर, लॅक्टिक आम्ल आणि कार्बन-डायऑक्साइड वायूत होतं. मिश्रणात लॅक्टिक आम्लामुळे आंबटपणा येतो. कार्बन-डायऑक्साइड वायू पसरल्यामुळे, मिश्रणाला फेस म्हणजेच सच्छिद्रपणा प्राप्त होतो. उडीद डाळीला अंगभूत चिकटपणा असतो, त्यामुळे वायू मिश्रणाबाहेर निघून न जाता, तिथेच अडकतो. परिणामी मिश्रण फुगू लागतं. आपण म्हणतो, ‘पीठ आंबलं’.

आंबवण्यामुळे, पिठातल्या बी कॉम्प्लेक्स आणि जीवनसत्त्व क यांचं प्रमाण वाढतं. पिठातल्या पिष्टमय पदार्थ आणि प्रथिनं यांचं रूपांतर शर्करा आणि अमिनो आम्लामध्ये झाल्यामुळे इडलीचं पोषणमूल्य वाढतं. या सार्‍या प्रक्रियेसाठी हवामान उबदार असणं आवश्यक आहे. पिठाचं तापमान २५-३० अंश सेल्सियस असलं पाहिजे. तापमान जितकं उबदार तितकी ही प्रक्रिया लवकर होते. हवामान जितकं थंड तितकी ही प्रक्रिया सावकाश होते. त्यामुळे उन्हाळ्यात इडलीचं पीठ ८-१० तासांतच चांगलं फुगतं तर हिवाळ्यात त्यासाठी १०-१२ तास लागू शकतात. थंड हवेच्या प्रदेशात तर मिश्रण फुगण्यासाठी ते कृत्रिमरीत्या उबदार हवेत ठेवतात.

  • डॉ. अरुंधती जोशी
    मराठी विज्ञान परिषद
    ईमेल : office@mavipa.org
    संकेतस्थळ : http://www.mavipa.org