बर्‍याचदा ॲनिमिया, ल्युकेमियासारख्या आजारांत रक्तातल्या प्लेटलेट्स कमी झाल्या तर किंवा एखाद्या अपघातात खूप जास्त रक्तस्राव झाला तर जीव वाचावा म्हणून आपल्याला दुसर्‍या माणसाचं रक्त दिलं जातं. शंभर वर्षांपूर्वीपर्यंत हा एक मोठा जुगार होता, कारण काही वेळा दुसर्‍या माणसाचं रक्त दिल्यावर माणसं मरत असत. यामागचं कारण १९०० साली ऑस्ट्रियन डॉक्टर कार्ल लँडस्टाइनर यांनी शोधलं. डॉ. कार्ल काही रोग्यांमध्ये रक्तसंक्रमण म्हणजे ‘ब्लड ट्रान्सफ्यूजन’ करत होते. त्या वेळी त्यांच्या असं लक्षात आलं की, रक्तसंक्रमणानंतर काही रोगी ठणठणीत बरे होत आहेत, याउलट काही मात्र चक्क मरताहेत. त्यांनी बरेच प्रयोग करून असं सिद्ध केलं की, वरवर पाहता सगळ्या माणसांचं रक्त एकसारखं वाटलं तरी त्यात सूक्ष्म फरक असतो. त्यामुळे त्यांनी रक्ताचे वेगवेगळे ए, बी, एबी, ओ ( अ, इ, अइ, ड) असे गट केले.

कालांतरानं डॉ. कार्ल यांच्या आणखी एक गोष्ट लक्षात आली. समजा दोन माणसांचा रक्तगट एकसारखा म्हणजे ‘ओ’ आहे. तरीही काही वेळा त्यांना एकमेकांचं रक्त चालत नाही. यावर संशोधन केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की, एका माणसाच्या तांबड्या पेशींमध्ये ‘आरएच (फँ)’ नावाचा एक घटक असतो. त्याच्या रक्ताला त्यांनी ओ आरएच पॉझिटिव्ह ( ड फँ+) असं नाव दिलं आणि दुसर्‍याच्या तांबड्या पेशींमध्ये हा घटक नसल्यामुळे त्याच्या रक्ताला ओ आरएच निगेटिव्ह ( ड फँ-) म्हटलं. या ‘आरएच (फँ)’ विसंगतीमुळेच त्यांचं रक्त एकमेकांना चालत नाही.

आता आपल्या रक्ताचे ए आरएच पॉझिटिव्ह ( अ फँ+ ), ए आरएच निगेटिव्ह ( अ फँ-), बी आरएच पॉझिटिव्ह ( इ फँ +), बी आरएच निगेटिव्ह ( इ फँ-), एबी आरएच पॉझिटिव्ह ( अइ फँ+ ), एबी आरएच निगेटिव्ह (अइ फँ-), ओ आरएच पॉझिटिव्ह ( ड फँ+ ), ओ आरएच निगेटिव्ह ( ड फँ-) असे प्रकार मानले जातात. ओ आरएच निगेटिव्ह या गटाचं रक्त कुणालाही चालतं म्हणून या गटाचं रक्त असलेल्या व्यक्तीला ‘युनिव्हर्सल डोनर’ म्हणतात आणि एबी आरएच पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या माणसाला कोणत्याही गटाचं रक्त चालतं म्हणून त्याला ‘युनिव्हर्सल ॲक्स्पेटर’ म्हणतात. असं असलं तरी प्रत्यक्ष रक्तसंक्रमणापूर्वी रक्तगटाबरोबरच इतर अनेक घटक जुळतात का हे तपासलं जातं.

काही कारणामुळे आपल्याला चुकीचा रक्तगट असलेलं रक्त दिलं गेलं तर मात्र त्याचे गंभीर परिणाम होतात. आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक यंत्रणा या रक्तगट वेगळ्या असलेल्या रक्ताला शत्रू समजून तात्काळ नष्ट करू पाहते. त्यामुळे खूप ताप येणं, श्वसनास त्रास होणं, मूत्रपिंड निकामी होणं, हृदयविकाराचा झटका येणं असे त्रास होतात. आजचं धकाधकीचं जीवन बघता आपल्याला कधीही रक्ताची गरज पडू शकते. त्यामुळे आपला रक्तगट कुठला आहे हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे.

  • डॉ. माधवी ठाकूरदेसाई
    मराठी विज्ञान परिषद
    ईमेल : office@mavipa.org
    संकेतस्थळ : http://www.mavipa.org