आपण रोजच्या आयुष्यात पोलाद म्हणजेच स्टीलचा अनेक ठिकाणी वापर करतो. पण ते नेमकं काय आहे आणि ते इतकं महत्त्वाचं का आहे याचा विचार आपण क्वचितच करतो. घरातली गॅसची शेगडी, सायकल, मोटार, पूल, इमारती, रेल्वे, विजेचे खांब या सगळ्यांचा कणा म्हणजे पोलाद! पोलाद नसतं तर आधुनिक जीवनाची कल्पनाच करता आली नसती. निसर्गात मिळणारं शुद्ध लोखंड मऊ आणि सहज वाकणारं असतं. मजबूत आणि टिकाऊ धातू मिळवण्यासाठी त्यावर प्रक्रिया करून पोलाद तयार केलं जातं. लोखंडात सुमारे ०.०२ ते २.१ टक्के कार्बन मिसळल्यास पोलाद बनतं, जे अधिक मजबूत असतं. थोड्या इतर धातूंच्या मिश्रणानं गंजरोधक किंवा अधिक कडक पोलाद तयार होतं.
म्हणून घरातल्या वस्तूंपासून ते कारखान्यातल्या यंत्रांपर्यंत अनेक वस्तू पोलादापासून बनतात.पोलादाची ताकद वाढवण्यासाठी उष्णतेचाही वापर केला जातो. याला ‘उष्मा प्रक्रिया’ म्हणतात. यामध्ये ‘क्वेन्चिंग व टेम्परिंग’ ही पद्धत महत्त्वाची आहे. या प्रक्रियेत लोखंडाला उच्च तापमानापर्यंत गरम केलं जातं. नंतर ते एकदम थंड पाण्यात किंवा तेलात बुडवलं जातं. त्यामुळे त्यातल्या अणूंची मांडणी ‘मार्टेन्झाइट’ नावाच्या अतिशय कडक स्वरूपात होते. त्यामुळे पोलाद खूप मजबूत होतं. दुसरीकडे, ‘ॲनिलिंग’ नावाच्या प्रक्रियेत धातू हळूहळू थंड केला जातो. यामुळे धातूमधील अंतर्गत ताण कमी होतो. धातू कमी ठिसूळ आणि अधिक टिकाऊ बनतो. म्हणजे गरजेनुसार कधी कडकपणा वाढवला जातो, तर कधी लवचीकता वाढवली जाते. पोलाद फक्त उष्मा प्रक्रियेतून मजबूत केलं जातं असं नाही. जेव्हा लोखंडाला ठोकलं जातं किंवा रोलर्समधून दाबलं जातं, तेव्हा त्याची आतली रचना अधिक दाट होते. या बदलामुळं धातू अधिक कडक होतो. या प्रक्रियेला ‘वर्क हार्डनिंग’ असं म्हणतात. तलवारी बनवताना, बांधकामात वापरल्या जाणार्या लोखंडी सळ्या तयार करताना किंवा पत्रे बनवताना या पद्धतीचा उपयोग केला जातो.
प्रत्येक धातू हा लहान-लहान स्फटिकांपासून, म्हणजेच ‘ग्रेन’पासून बनलेला असतो. जर हे ग्रेन लहान असतील, तर धातू अधिक मजबूत असतो. विशिष्ट रासायनिक प्रक्रिया किंवा उष्मा प्रक्रियेतून हे ग्रेन लहान करता येतात. त्यामुळे पोलादाची ताकद आणखी वाढते. पोलाद म्हणजे लोखंडावर वैज्ञानिक प्रक्रिया करून तयार केलेला एक मजबूत धातू आहे. त्यामुळे घरं सुरक्षित राहतात, पूल टिकतात, गाड्या-रेल्वे आणि यंत्रं विश्वासार्ह चालतात. आपल्या दैनंदिन सुरक्षिततेसाठी तसेच आपल्या सोयीच्या वस्तू बनवण्यासाठी पोलादाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. म्हणून त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
– गिरीश घाटे , मराठी विज्ञान परिषद
