– सुनीत पोतनीस  sunitpotnis94@gmail.com

सोळाव्या शतकात एस्तोनियाच्या पश्चिम किनारपट्टीत स्वीडनच्या राजाने आपले वर्चस्व स्थापन करीत तिथे सत्ता स्थापन केली. इ.स. १५५८ मध्ये रशियाच्या इव्हान द टेरिबल या झारने एस्तोनियावर आक्रमण करीत मोठा विध्वंस सुरू केला, त्यावेळी उत्तरेतल्या डॅनिश राजाने स्वीडनच्या राजाला शरण जाऊन त्यांची मदत घेतली तर दक्षिणेतल्या राजाने पोलंडची. पुढे १५८३ मध्ये या दोन्ही राज्यांचे रशियन फौजांबरोबर युद्ध होऊन त्यात रशियाचा पराभव झाला. त्यानंतर उत्तरेत स्वीडिश एस्तोनिया आणि दक्षिणेत पोलिश एस्तोनिया अशी विभागणी झाली. उत्तरेतला छोटा प्रदेश मात्र डॅनिश राजाच्या ताब्यात राहिला. पुढे स्वीडन आणि पोलंड यांच्यात युद्ध होऊन एस्तोनिया पूर्णपणे स्वीडिश राजाच्या आधिपत्याखाली आला. स्वीडिश सत्ता पुढची ११० वर्षे एस्तोनियावर टिकली. या काळात स्वीडिश शासनाने एस्तोनियन प्रजेसाठी अनेक कल्याणकारी योजना अमलात आणल्या, शेतीत सुधारणा केल्या.

१७०० साली रशियन झारने परत एकदा ताज्या दमाने एस्तोनियावर आक्रमण केले. हे ग्रेट नॉर्दन वॉर दहा वर्षे चालले आणि स्वीडनचा पराभव होऊन १७१० मध्ये एस्तोनियाचा ताबा रशियन साम्राज्याकडे आला. रशियन सत्ताधाऱ्यांनी एस्तोनियातल्या जर्मन जमीनदार आणि शेतक ऱ्यांना झुकते माप देऊन अधिक सवलती दिल्यामुळे एस्तोनियन लोकांमध्ये असंतोष पसरला. या काळात जर्मन ही अधिकृत शासकीय भाषा आणि शिक्षणाचे माध्यम म्हणून प्रचलित होती. १८ व्या शतकाच्या मध्यावर एस्तोनियन जनतेत सत्ताधाऱ्यांबद्दल असंतोष वाढून एस्तोनियन राष्ट्रीयत्वाची भावना मूळ धरू लागली. लॅटिन आणि जर्मन भाषेतले बायबल या काळात एस्तोनियन भाषेत अनुवाद केले गेले. १८६९ साली मातृभाषा अधिक प्रचलित करण्यासाठी एस्तोनियन भाषेत काव्य आणि संगीत महोत्सव भरविला गेला.

१९ व्या शतकाच्या अखेरीस रशियाने त्यांच्या सत्तेखालील बाल्टिक प्रदेशात रूसीकरण सुरू केले. शिक्षणाचे माध्यम म्हणून रशियन भाषा सक्तीची करून एस्तोनियन सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांवर बंदी आणली गेली. या बदलाची मोठी प्रतिक्रिया उमटून विसावे शतक उगवताना नवे एस्तोनियन राजकीय नेतृत्व उदय पावून १९०५च्या रशियन क्रांतिकाळात एस्तोनियन राजकीय पक्ष स्थापन झाले.