कर्नाटकातल्या वनांत राहणारी आणि मातृसत्ताक पद्धती पाळणारी ‘हल्लाकी वोक्कालिगा’ जमात, पर्यावरणाशी इमान राखून जंगलांचे संवर्धन करते. याच जमातीतील तुलसी गौडा कर्नाटक राज्यातील अंकोला तालुक्यातील होणाल्ली नावाच्या गावातून पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी २०२० मध्ये दिल्लीला गेली. वन खात्याच्या रोपवाटिका संभाळण्याचे काम करणाऱ्या निरक्षर तुलसीने तिच्या हयातीत एक लाखाहून अधिक वृक्षारोपण केले. लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण न घेतलेली ही महिला पर्यावरणाविषयी अत्यंत सजग आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९४४ साली अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेली तुलसी दोन वर्षांची असतानाच पित्याचे छत्र हरपले. तिच्या मजूर आईने गोिवद गौडा नावाच्या वयाने बऱ्याच मोठय़ा असलेल्या माणसाशी तिचे लग्न लावून दिले. शिक्षणाची संधी न मिळालेल्या तुलसीला लिहिता आणि वाचता येत नाही, परंतु कर्नाटक राज्याच्या वन खात्यातील रोपवाटिकांमध्ये सतत काम करून वृक्ष संवर्धन आणि वनस्पतीशास्त्रातल्या अमूल्य ज्ञानात ती पारंगत झाली. वयाच्या सत्तराव्या वर्षी सेवानिवृत्त होताना तिच्या पारंपरिक ज्ञानाची व्याप्ती पाहून आणि तिने राबविलेल्या वनीकरण मोहिमा पाहून शासनही थक्क झाले. तिच्या या कामासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यात १९८६ सालचा इंदिरा प्रियदर्शनी विश्वामित्र पुरस्कार आणि १९९९ साली मिळालेल्या कर्नाटक राज्याच्या राज्योत्सव पुरस्काराचा समावेश आहे. राज्योत्सव पुरस्कार आपल्या कार्यक्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यालाच मिळतो. वनराईत काम करण्याचा ६० वर्षांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे पर्यावरणतज्ज्ञ तुलसी यांना ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट’ असे म्हटले जाते. जमातीतील लोक त्यांना ‘वृक्ष देवी’ असे म्हणतात.

जंगलात अनेक वृक्ष असतात परंतु प्रत्येक प्रजातीच्या वृक्षाचे एक माता-झाड असते. हे झाड लहान रोपांना आणि रुजणाऱ्या बियांना जमिनीखालून आधार देते. या वाढणाऱ्या रोपटय़ांना मुळांवाटे नायट्रोजन आणि इतर पोषकद्रव्ये पुरवते. अशी झाडे तुलसी गौडा यांना नेमकी ओळखता येतात. त्यांनी मोठय़ा प्रमाणात बियांचे संकलन केले आहे. या बियांपासून रोपे तयार करण्यासाठी त्या सतत झटतात. महत्त्वाच्या ३०० औषधी वनस्पती त्यांनी शोधून काढल्या आहेत.

त्यांच्या गावातील स्त्रियांच्या हक्कांसाठीसुद्धा त्या लढल्या आहेत. अशा या जंगलांचा विश्वकोश असणाऱ्या आणि न कचरता आपल्या पारंपरिक वेशात पद्मश्री स्वीकारणाऱ्या  तुलसी गौडांपासून अनेक शिक्षित स्त्री-पुरुषांना खूप काही शिकता येईल.

डॉ. नंदिनी वि. देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian environmentalist tulsi gowda from karnataka state zws
First published on: 02-12-2022 at 04:29 IST