scorecardresearch

भाषासूत्र : गौडबंगाल

एरवी पुरोगामी असलेला बंगाल जारणमारण, मंत्रतंत्र, गारूड, जादूटोणा या गूढविद्यांसाठीही पूर्वीपासून प्रसिद्ध आहे

भानू काळे bhanukale@gmail.com

एखादी गोष्ट आपल्या लक्षात येत नसेल, तर ‘हे काय गौडबंगाल आहे?’ असे आपण म्हणतो. शब्दकोशात गौडबंगाल शब्दाचे अनाकलनीय, गारूड, मंत्रतंत्र, रहस्यमय, जादूटोणा असे अर्थ दिलेले असतात. बंगाल शब्द आपल्याला ठाऊक असतो. पण गौड हा जोडशब्द कुठून आला? आणि त्या दोन्ही शब्दांचा जादूविद्येशी संबंध काय?  गौड हा भारताचा पूर्वेकडील एक विस्तीर्ण प्राचीन भूभाग. कृ. पां. कुलकर्णी यांच्या ‘मराठी व्युत्पत्ति कोशा’नुसार प्राचीन काळी ब्राह्मणांच्या १० प्रमुख पोटजाती मानल्या गेल्या होत्या : पंचगौड आणि पंचद्रविड. द्रविड भागाशी जोडल्या गेलेल्या दक्षिणेकडच्या पाच आणि गौड भागाशी जोडल्या गेलेल्या पूर्वेकडच्या पाच. गौड सारस्वत त्यांतलीच एक पोटजात. बंदोपाध्याय (बॅनर्जी), चट्टोपाध्याय (चॅटर्जी), मुखोपाध्याय (मुखर्जी) आणि गंगोपाध्याय (गांगुली) ही प्रसिद्ध बंगाली आडनावे पंचगौडांपैकीच. बंगालचा समावेश प्राचीन काळी गौड भागात करत. स्कंदपुराणात गौड देश म्हणजे वंगदेशापासून भुवनेश्वपर्यंतचा भाग असा उल्लेख आहे. सध्याच्या बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्हा आणि मालदा जिल्हा हे प्राचीन गौड भागाचे मुख्य स्थान. पुढे मुस्लिम राज्यकर्त्यांनी गौड आणि बंगाल या दोन्ही भागांचा एकत्रित उल्लेख बंगाल म्हणून करायला सुरुवात केली. सुपीक जमीन आणि भरपूर पाणी असल्याने बंगाल अतिशय संपन्न होता. गूढतेचे व रहस्यमयतेचे आकर्षण इथे फार. सत्यजित रे यांच्यासारख्या प्रतिभावंतांनीही अनेक रहस्यकथा लिहिल्या. एरवी पुरोगामी असलेला बंगाल जारणमारण, मंत्रतंत्र, गारूड, जादूटोणा या गूढविद्यांसाठीही पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. बंगाली जादूगार ‘महाबली.. काली कलकत्तेवाली.. छू मंतर’ वगैरे म्हणत पिशाच्चबाधा उतरवणे, रोगांवर मांत्रिक उपचार करणे असले अंधश्रद्ध प्रकार करत असत. पी. सी. सरकार यांच्यासारखे जगप्रसिद्ध जादूगार इथलेच. इंग्रज लेखकांना चक्रावून टाकणारी ‘इंडियन रोप ट्रिक’ ही जादू इथलीच. गूढबंगाल म्हणजे गौडबंगाल अशीही एक व्युत्पत्ती केली जाते. ज्या प्रांताने रवींद्रनाथ टागोर, अमर्त्य सेन आणि अभिजित बॅनर्जीसारखे नोबेल पुरस्कार विजेते निर्माण केले, तोच बंगाल प्रांत जादूटोण्यासाठी देखील का प्रसिद्ध असावा हेही एक गौडबंगाल आहे! 

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian rope trick marathi word marathi language learning zws

ताज्या बातम्या