लहान वयात अशा दर्जेदार जागतिक स्पर्धेचा अनुभव घेणे हेही स्पर्धकांसाठी मानाचे आहे. प्रत्येक प्रश्नासाठी सरासरी दीड तास मिळतो. पहिल्या दिवशीची प्रश्नपत्रिका (तीन प्रश्न) दुसऱ्या दिवसापेक्षा थोडी सोपी असते. त्यातही पहिला प्रश्न बऱ्याच जणांना सोडवता येईल व त्यामुळे त्यांचा उत्साह वाढेल असे पाहिले जाते. प्रश्नपत्रिकेमध्ये मुलांना भाषा, संकल्पना, चिन्हे याबद्दल शंका असल्यास अर्ध्या तासात शंकासमाधानाचे काम केले जाते. दुसऱ्या दिवशीची प्रश्नपत्रिका पहिल्या दिवसापेक्षा कठीण असते. विशेषत: त्यातील अंतिम, म्हणजे सहावा प्रश्न सर्वात कठीण असतो. उदाहरणार्थ, पहिला प्रश्न सुमारे ६० ते ६२ टक्के मुले सोडवतात तर सहावा प्रश्न फक्त पाच ते सात टक्के मुले सोडवू शकतात!

प्रत्येक प्रश्नाला सात गुण म्हणजे एकूण जास्तीत जास्त ४२ गुण मिळू शकतात. प्रत्येक प्रश्न कसा तपासायचा, उत्तरातील प्रत्येक पायरीला किती गुण द्यायचे याचे विश्लेषण सर्वाना उपलब्ध असते. एखादा प्रश्न सोडवण्याच्या एकाहून अधिक पद्धती असतील तर प्रत्येक पद्धत विचारात घेतली जाते. एका प्रश्नाला शून्य ते सातपैकी कितीही गुण अंशत: देता येतात पण अपूर्णाकात गुण देता येत नाहीत. त्यासाठी प्रदीर्घ बैठका होतात आणि गुण निश्चित केले जातात. पदक मिळवण्यासाठी एकेका गुणाचे महत्त्व असते. किती गुण मिळाल्यास कोणते पदक द्यायचे ते त्या वर्षांच्या एकूण कामगिरीकडे पाहून ठरवले जाते. साधारणपणे या तीन पदकांचे प्रमाण १:२:३ असे असते. म्हणजेच एकंदर  ४८० स्पर्धक असतील तर ४० सुवर्ण, ८० रौप्य आणि १२० कांस्य पदके दिली जातात. स्पर्धकाने केवळ एकच प्रश्न अचूक सोडवून सात गुण मिळवले तर उल्लेखनीय कामगिरीचे प्रशस्तिपत्रक दिले जाते. सर्वात जास्त सुवर्णपदके मिळाली असतील त्या देशाला प्रथम क्रमांक व त्यानंतर रजतपदके, कांस्यपदके यांची संख्या विचारात घेऊन क्रमवारी लावली जाते.

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी समारोपाच्या शानदार सोहळ्यात सुवर्णपदकांचे वितरण एकेक विजेत्याला रंगमंचावर बोलावून होते. रौप्य आणि कांस्य पदकांच्या वितरणासाठी १०-१२ जणांच्या गटाला एकदम रंगमंचावर बोलावून पदके दिली जातात. सर्व प्रश्न अचूक सोडवून ४२ गुण मिळवणाऱ्या स्पर्धकांचा विशेष सन्मान केला जातो. एखाद्या प्रश्नाचे परीक्षकांनाही न सुचलेले, नेत्रदीपक उत्तर कोणी दिले असेल तर त्याचाही गौरव केला जातो. समारंभानंतर खास भोजन, सर्व देशांच्या संघांनी आणलेल्या भेटवस्तूंची देवाणघेवाण होते. पुढील वर्षांचे ऑलिम्पियाड जेथे भरणार असेल तेथील प्रतिनिधी एखादी चित्रफीत दाखवून तयारीविषयी माहिती देतात. सोहळा संपतो आणि हा ११ दिवसांचा अविस्मरणीय अनुभव बरोबर घेऊन स्पर्धक मायदेशी परततात.

– डॉ. रवींद्र बापट

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org