scorecardresearch

कुतूहल : लोहटोप पाषाण

सल्फाइड रूपातील धातुकांच्या नव्या साठय़ांच्या शोधासाठी एका तांबूस किंवा नारंगी पाषाणाचा शोध घेतला जातो

कुतूहल : लोहटोप पाषाण
(संग्रहित छायाचित्र)

तू सहसा निसर्गात मूळ रूपात सापडत नाहीत तर ते संयुगांच्या स्वरूपात आढळतात. त्या संयुगांनाच आपण धातूखनिजे म्हणतो. त्यातल्या ज्या मोजक्या खनिजांपासून धातू किफायतशीर पद्धतीने वेगळा काढता येतो, अशा खनिजांना धातुके (ओअर्स) म्हणतात. आपल्या पूर्वजांना आधी धातुकांची माहिती झाली, आणि मग धातूंची. धातुकांपासून धातूंचे उत्पादन करण्यासाठी माणसाला दोन बाबींकडे लक्ष द्यावे लागते. धातुकांच्या नव्या साठय़ांचा शोध घेणे आणि धातुकांवर प्रक्रिया करून मूळ धातू मिळविणे.

सल्फाइड रूपातील धातुकांच्या नव्या साठय़ांच्या शोधासाठी एका तांबूस किंवा नारंगी पाषाणाचा शोध घेतला जातो. तो पाषाण कसा निर्माण होतो, हे पहाणेही स्वारस्यपूर्ण आहे. पृथ्वीवरील सर्वच खडकांना विदारणाला सामोरे जावे लागते. विदारणामुळे खडकांची नुसती झीजच होते असे नाही. खडकांचे रासायनिक विघटनही होत असते. रासायनिक विघटनात भूजलाचा वाटा फार मोठा असतो. भूजल हे रासायनिकदृष्टय़ा शुद्ध पाणी नव्हे. खडकांमधील खनिजे अल्प प्रमाणात भूजलात विरघळतात आणि त्याचे रूपांतर एका द्रावणात होते. त्या द्रावणाच्या संपर्कात आल्यावर सल्फाइडचे विघटन सुरू होते, त्यातून भूजल आम्लधर्मी होते.

खनिजसाठय़ाच्या अगदी वरच्या भागाचे विघटन फारच मोठय़ा प्रमाणावर होते. तेथील खडकात असणाऱ्या लोहाचा सहभागही या सर्व प्रक्रियेमध्ये असतोच. ज्या काही रासायनिक अभिक्रिया घडून येतात, त्यातून पाण्यात विद्राव्य असणारी काही संयुगे तयार होतात. दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याबरोबर ती वाहून जातात. खनिजसाठय़ाच्या वरच्या भागात लोहाचे ऑक्साइड आणि हायड्रॉक्साइड तेवढे मागे उरते. त्यांचा रंग लोखंडाच्या गंजासारखा लालसर, पिवळसर किंवा फिकट नारंगीअसतो. त्यात थोडाफार सिलिकाचा, म्हणजे सिलिकॉन डाय ऑक्साइडचाही अंश असतो.

विदारणप्रक्रियेद्वारे नव्याने निर्माण झालेला तांबूस अथवा लालसर दिसणारा हा पाषाण धातुकाच्या साठय़ाच्या डोक्यावर एखाद्या टोपीसारखा विराजमान होतो. त्या टोपीचे महत्त्व एवढय़ासाठी की खाली, धरणीच्या पोटात, पण पृष्ठभागापासून जवळच लाखो टन धातुकाचा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही ही टोपी भूवैज्ञानिकाला देत असते. अशा टोपीला इंग्रजीत गॉसन, म्हणजे लोखंडाची टोपी असे म्हणतात. मराठीत आपण त्याला लोहटोप असे म्हणू. मध्य प्रदेशातील मालजखंड येथील तांब्याच्या धातुकाचा साठा अशाच टोपीमुळे हाती लागला होता.

– डॉ. विद्याधर बोरकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Information about metal ore facts about iron ore zws