विविध आजारांपासून संरक्षण प्रदान करण्यासाठी त्याचबरोबर रोगांच्या संक्रमणाची यंत्रणा समजून घेऊन मानवाच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक प्रणालीतील प्रतिसाद पद्धती ओळखणे व शरीराच्या संरक्षणप्रणालीविषयी ज्ञान प्राप्त करून घेणे महत्त्वाचे असते. आजारांचा प्रादुर्भाव बऱ्याचदा लोकसंख्या, भौगोलिक स्थिती, अन्न-सवयी, आनुवंशिकता इत्यादी स्थानिक घटकांवरसुद्धा अवलंबून असू शकतो. त्यामुळे या बाबी विचारात घेऊन संशोधन करणे ही त्या राष्ट्राची जबाबदारी असते आणि म्हणूनच त्या अनुषंगाने भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागांतर्गत नवी दिल्ली येथे कार्यरत असलेल्या ‘राष्ट्रीय प्रतिरक्षा विज्ञान संस्थे’स (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनॉलॉजी) विशेष महत्त्व आहे. इ.स.१९८३-९१या काळात सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ प्राध्यापक जी.पी. तलवार हे या संस्थेचे संस्थापक संचालक होते. सध्या राष्ट्रीय प्रतिरक्षा विज्ञान संस्थेत संसर्ग व प्रतिकारशक्ती, आण्विक संकल्पन, जनुक नियमन आणि पुनर्निर्माण व विकास या चार मुख्य शाखांतून प्रामुख्याने संशोधन केले जाते. यामध्ये मानवीय रोगप्रतिकारशास्त्रामधील संशोधनासाठी टी आणि बी-लिम्फोसाइट यांचे मूलभूत जीवशास्त्र, संसर्गजन्य रोगजंतूंना प्रतिसाद देण्यासाठी रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे वापरल्या जाणाऱ्या यंत्रणांची कार्यप्रणाली आणि संसर्ग आणि रोग प्रस्थापित करण्यासाठी विविध रोगजंतूंनी वापरलेल्या क्लृप्त्या या विषयांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रोगजंतूंविरुद्ध नावीन्यपूर्ण इम्युनोजेन्स, कर्करोगविरोधी एजंट आणि उपचारात्मक प्रतिबंधके तयार करण्यात राष्ट्रीय प्रतिरक्षा विज्ञान संस्थेचा मोलाचा वाटा आहे. यामध्ये मानवीय संरक्षणप्रणाली, संसर्गजन्यरोग, प्रजनन-जीवशास्त्र आणि संरचनात्मक व रासायनिक जीवशास्त्र या विषयात गेल्या दोन दशकांत येथे करण्यात आलेले संशोधन आंतरराष्ट्रीय स्तराच्या वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. कुष्ठरोगासाठी पहिली लस राष्ट्रीय प्रतिरक्षा विज्ञान संस्थेत विकसित करण्यात आली. विशेष म्हणजे लस बनविण्यासाठी वापरण्यात येणारा जिवाणू जगभरात ‘मायकोबॅक्टेरियम इंडिकस प्रानी’ या नावाने ओळखला जातो. कुष्ठरोगाची बाधा न करू शकणारा ‘मायकोबॅक्टेरियम’ जिवाणू भारतातून संवर्धित केल्यामुळे ‘इंडिकस’; तसेच प्रा. जी. पी.  तलवार यांचे टोपणनाव ‘प्राण’ व नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनोलॉजीचे संक्षिप्त नाव ‘एनआयआय’ यांचे संयोजित नाव ‘प्रानी’    (Pran+nii) असे मिळून ‘मायकोबॅक्टेरियम इंडिकस प्रानी’ हे वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे. आंतरविद्याशाखीय विषयांत गरजा लक्षात घेऊन प्रगत जैविक विज्ञानातील अत्याधुनिक वैज्ञानिक माहितीच्या प्रसारासाठी एनआयआय राष्ट्रीय स्तरावर नियमित व्याख्याने आयोजित करीत असते. नव्याने उद्भवणारे संसर्गजन्य आजार व बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या यांचा अभ्यास व निराकरण करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय प्रतिरक्षा विज्ञान संस्था भविष्यातदेखील उत्तम संशोधन पार पडण्याची क्षमता ठेवत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about national institute of immunology zws
First published on: 14-01-2022 at 01:03 IST