जे आले ते रमले.. : पश्तुनी कबिले

‘कोहल’ हा कबिल्याचा सर्वात लहान हिस्सा असतो. असे अनेक कोहल म्हणजे परिवारांचा मिळून ‘प्लारीना’ बनतो

(संग्रहित छायाचित्र)

अनेक पिढय़ांपासून भारतात येऊन स्थायिक झालेल्या, भारतीयच झालेल्या पश्तून ऊर्फ पठाण समाजाचे मूळ निवासी क्षेत्र आहे अफगाणिस्तानमधील हिन्दुकुश पर्वतापासून पाकिस्तानातील सिंधू नदीच्या पश्चिमेकडील प्रदेशापर्यंत. टोळ्यांमध्ये म्हणजे कबिल्यात राहणे पसंत करणारे पठाण जगभरात अनेक देशांमध्ये विखुरले गेले आहेत.

‘कोहल’ हा कबिल्याचा सर्वात लहान हिस्सा असतो. असे अनेक कोहल म्हणजे परिवारांचा मिळून ‘प्लारीना’ बनतो. अनेक प्लारीनांचा ‘खेर अरजोई’ बनतो. सर्वात शेवटचा ‘चाहर’ म्हणजेच कबिला हा अनेक खेल अरजोईंचा मिळून बनतो. अशा पद्धतीने बनलेली ही कबिला रचना जरा गुंतागुंतीचीच आहे. बंगश, मसीद, आफ्रिदी, शलमोन, युसुफजाई, ओराक्जाई, मनिहार, नूरजाई, लोधी, नासर, बख्तियार, सुलेमानखैल, वजीर, दावर, उस्मानखैल, बाबई, हमार, खलील, मोहम्मदजाई अशी नावे असलेले शेकडो कबिले या पठाणांचे असून त्यांपैकी बहुतेक पठाण ही नावे आपल्या घराण्याचे नाव म्हणून वापरतात. गेल्या दोन-तीन शतकांत अफगाणिस्तान आणि वायव्य पाकिस्तानात झालेल्या शहरीकरणातून काबूल, क्वेट्टा, कंदहार, पेशावर वगैरे मोठी शहरे निर्माण झाली आणि पठाणांची टोळ्यांनी राहण्याची पद्धत कमी होत गेली. तरीही बरेच पठाण एकमेकाला त्यांच्या कबिल्याच्या नावावरून ओळखतात. मानववंशशास्त्रतज्ज्ञांच्या मते पठाण लोक हे मूळचे इराणी वंशाचे आहेत परंतु स्तिमीत करणारी गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानातले अनेक पठाण टोळीवाले स्वत:ला मूळचे बेने इस्रायली यहुदी असल्याचे समजतात! धार्मिक छळामुळे त्रासलेली अनेक यहुदी म्हणजे ज्यू कुटुंबे उत्तर इस्रायलमधून शिताफीने बाहेर पडली आणि दूरवरच्या प्रदेशात जमेल तिथे स्थायिक झाली. त्यांपैकी काही कुटुंबे अलिबागच्या किनाऱ्यावर उतरली आणि हे लोक बेने इस्रायली या नावाने ओळखले जातात. हे लोक अलिबागला पोहोचण्यापूर्वी त्यातले काही लोक कराचीच्या परिसरात पोहोचले. कराचीला पोहोचलेल्यांचे पुढचे वंशज उत्तरेत जाऊन पठाणांप्रमाणे टोळ्यांनी राहू लागले. पुढे सातव्या-आठव्या शतकात इस्लामचा उदय आणि प्रसार झाल्यावर या सर्वानी इस्लाम धर्म स्वीकारला व पठाण समाजाशी एकरूप झाले.

sunitpotnis@rediffmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Information about pashtoon qabila

ताज्या बातम्या