कुतूहल : कोबाल्ट

अजैविक स्वरूपातील कोबाल्ट हा जिवाणू, एकपेशीय वनस्पती आणि बुरशी यांचा सूक्ष्म पोषक आहे. 

(संग्रहित छायाचित्र)

१७३९ मध्ये स्वीडिश शास्त्रज्ञ जॉर्ज ब्रँट यांनी एका गडद निळ्या रंगाच्या खनिजापासून कोबाल्टचा शोध लावला. निळ्या रंगाची काच तयार होताना येणारा रंग हा बिस्मथमुळे नसून अन्य रासायनिक घटकामुळे आहे. हे सिद्ध करताना हा शोध लागला. मूळ  कोबाल्टची बिस्मथबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन निळी रंगद्रव्ये तयार होतात.

कोबाल्ट हे नाव जर्मन कोबोल्ड (सहजासहजी न दिसणारे/ सापडणारे या अर्थाने) या शब्दापासून देण्यात आले. कोबाल्ट हे सामान्यत: निकेल, लोह, तांबे, चांदी मिळविण्याच्या प्रक्रियेतील उपउत्पादन! कोबाल्ट हा करडय़ा रंगाचा कठीण असा धातू. कोबाल्टचे जगात सर्वाधिक उत्पादन (५०%) आफ्रिका खंडाच्या मध्यभागी असणाऱ्या ‘काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक’या देशातून होते. त्याखालोखाल सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, झाम्बिया, चीन यांचा क्रमांक येतो.

कोबाल्ट सिलिकेट, कोबाल्ट अ‍ॅल्युमिनेट यांसारख्या संयुगांपासून मिळणाऱ्या निळ्या रंगाच्या शाईचा उपयोग काच, सिरॅमिक, वार्निश तसेच शोभेच्या वस्तूंमध्ये केला जातो.

नैसर्गिकदृष्टय़ा कोबाल्ट हे एक स्थिर समस्थानिकआहे. परंतु त्यापासून तयार होणाऱ्या कोबाल्ट-५०, कोबाल्ट-६० याकिरणोत्सारी समस्थानिकांचा वापर व्यावसायिकदृष्टय़ा प्रचंड ऊर्जा असलेले गॅमा किरण तयार करण्यासाठी केला जातो, ज्याचा वापर कर्करोगावरील उपचारात केला जातो.

‘वैद्यकीय बंदुकीत’ कोबाल्ट-६० या समस्थानिकाचे कण ठेवून घातक अर्बुदांवर (टय़ूमरवर) त्यांचा मारा केला जातो, यात दूषित पेशी नष्ट होतात. एक न गंजणारा धातू असल्यामुळे कोबाल्टचा उपयोग धातूच्या वस्तूंना मुलामा देण्यासाठी आणि मिश्र धातू तयार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर उच्च तापमानात धातू कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे, जेट इंजिन, गॅसवर चालणारी जनित्रे, चुंबक, स्टेनलेस स्टील यामध्येदेखील कोबाल्ट वापरले जाते. कोबाल्टपासून निळी तसेच पिवळी आणि हिरवी रंगद्रव्येदेखील बनविता येतात.

अजैविक स्वरूपातील कोबाल्ट हा जिवाणू, एकपेशीय वनस्पती आणि बुरशी यांचा सूक्ष्म पोषक आहे.

कोबाल्ट हे सर्व प्राणिमात्रांच्या शरीरातील एक महत्त्वाचे खनिज आहे.

ई-१२ व्हिटॅमिनच्या शरीरातील कमतरतेबद्दल अलीकडे सतत ऐकावयास मिळते; ती भरून काढण्यासाठी कोबाल्ट हा एक महत्त्वाचा स्रोत आहे.

– ललित जगन्नाथ गायकवाड

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Information and fact about cobalt