आपले जगणे अधिकाधिक सुकर करण्याच्या प्रयत्नातून मानवाला अनेक शोध लागले. त्यातलाच एक महत्त्वाचा शोध म्हणजे ‘चाक’ होय! मानवी इतिहासात डोकावले तर असे लक्षात येते की, अनेक शोधांमागची प्रेरणा मानवाला निसर्गातून आणि अवतीभोवती घडणाऱ्या घटनांमधून मिळाली. पण चाकसदृश नैसर्गिक वस्तू सहसा आपल्याला आढळत नाहीत. त्यामुळे चाकाचा शोध हा निव्वळ मानवी बुद्धिमत्तेचा आविष्कार असल्याचे अनेक तज्ज्ञ मानतात. काही जणांच्या मते मात्र, उतारावरून घरंगळत खाली येणारे दगड, वृक्षांचे गोलाकार काटछेद असलेले ओंडके पाहून मानवाला चाकाची कल्पना सुचली असावी. अत्यंत अवजड वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी ती वस्तू लाकडी ओंडक्यांवर ठेवून स्वत: किंवा जनावरांच्या मदतीने ओढत नेणे अधिक सोपे आहे, हे चाणाक्ष मानवाला समजले. त्यातूनच पुढे त्याने चाकाची निर्मिती केली असावी; कारण अगदी सुरुवातीचे चाक म्हणजे गोलाकार लाकडी ओंडक्याचा एक काप होता. अशी चार भरीव चाके फळीला बसवून मानवाने गाडा तयार केला असावा. प्राचीन काळातली अशी सुरुवातीची चाके पुरी इथल्या जगन्नाथाच्या रथाला असल्याचे आजही पाहायला मिळते.

चाकांचा व्यास जितका मोठा, तितके श्रम कमी होतात असे आढळल्यामुळे सुरुवातीला मोठय़ा आकाराची भरीव चाके तयार करण्यात आली. पण त्यासाठी चांगले लाकूड मिळणे अवघड होऊ लागल्यामुळे तीन फळय़ा एकमेकींना जोडून चाक तयार करण्याची पद्धत सुरू झाली. चाकाचा सर्वात जुना पुरावा म्हणजे सध्या इराकमध्ये असलेल्या मेसोपोटेमियातील किश इथल्या थडग्यांत सापडलेले इ.स.पूर्व ३५००च्या सुमाराचे अवशेष. तीन फळय़ांपासून तयार केलेल्या या चाकांच्या फळय़ा तांब्याच्या पट्टय़ांनी जोडलेल्या असल्याचे आढळते.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

स्थिर अक्षाभोवती किंवा आसाभोवती फिरणारी एक भरीव आणि ओबडधोबड वर्तुळाकृती वस्तू हे चाकाचे स्वरूप हळूहळू बदलत गेले आणि आरे असलेले चाक वापरात आले. लाकडी चाकाची धाव लवकर झिजू नये म्हणून त्यावर सुरुवातीला चामडय़ाच्या पट्टय़ांचे आच्छादन बसवले गेले. कालांतराने चामडय़ाची जागा तांब्याच्या पट्टय़ांनी घेतली. लोखंडाचा वापर सुरू झाल्यावर चाकाच्या केंद्रस्थानी असलेल्या तुंब्यातील भोकात लोखंडी नळीचा धारवा (बेअरिंग) बसवला गेला. त्यानंतर लाकडी आऱ्यांऐवजी धातूच्या तारेचे आरे वापरात आले. चाकाच्या या प्रगतीबरोबरच मानवी प्रगतीचाही इतिहास घडत गेला. चाकाचा वापर अनेक ठिकाणी विविध प्रकारे केला जाऊ लागला. पण प्राचीन काळी चाकाचा उपयोग अगदी वेगळय़ा प्रकारे केला गेला होता. याविषयी पुढच्या भागात!       

– हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org