इ.स. ९६९ साली, सध्याचे आधुनिक कैरो असलेल्या ठिकाणी फातिमीद या इस्लामी वंशाच्या जाव्हर अल् सिकीली या नेत्याने अल् काहिरा ही वस्ती वसवून तिथे आपली राजधानी केली. याच वस्तीचे पुढे कैरो या शहरात रूपांतर झाले. ११६९ साली फातिमीद राजांनी सलाउद्दीन याला इजिप्तचा वजीर म्हणून नियुक्त केले. क्रुसेड म्हणजे धर्मयुद्ध काळात सलाउद्दीनने अरब मुस्लिमांचे नेतृत्व करून विजय मिळवले आणि कैरो हीच राजधानी ठेवून इजिप्तवर आपल्या अयुबीद या वंशाचे राज्य स्थापन केले. इ.स. १२४५ मध्ये मामेलुक या गुलाम घराण्याच्या नेत्याने कैरोचा कब्जा घेऊन मामेलुक गुलाम घराण्याचे इजिप्तवरील शासन इ.स. १५१७ पर्यंत केले. आपल्या २६७ वर्षांच्या राज्यकाळात मामेलुक राजांनी नवीन रस्ते, नवीन वसाहती तयार करून कैरोचा विस्तार केला. याच काळात कैरो हे इस्लाम धर्माचे एक प्रमुख शिक्षणकेंद्र बनले. उत्तर आफ्रिकेतील प्रमुख व्यापारी रस्त्यावर कैरो असल्यामुळेही शहराचा मोठा विस्तार झाला. १३४० साली कैरोची लोकसंख्या पाच लाखांवर पोहोचून चीनच्या पश्चिमेकडील, जगातले सर्वाधिक मोठे शहर म्हणून कैरोची ओळख झाली. विकसित कैरोवर १३४८ ते १५१७ या काळात पन्नास वेळा ‘ब्लॅक डेथ’ची- म्हणजे प्लेगच्या साथीची धाड पडली. या आजाराने साधारणत: दोन लाख कैरोवासीय मृत्युमुखी पडले! पंधराव्या शतकाच्या अखेरीस कैरोची लोकसंख्या अडीच ते तीन लाखांपर्यंत घसरली. त्यातच भर म्हणून वास्को दि गामा याने भारताकडे जाण्याचा जलमार्ग शोधून, पूर्वेकडच्या मसाल्यांच्या व्यापारी रस्त्यावरील महत्त्वाच्या कैरो शहराचे महत्त्व कमी केले. पुढे १५१७ साली ओटोमन तुर्कानी इजिप्तवरील मामेलुक वंशांची सत्ता बरखास्त करून आपल्या साम्राज्यात इजिप्त सामील केले. इस्तंबूलच्या ओटोमन सुलतान सलीम प्रथमने इजिप्तचे स्थान केवळ आपल्या साम्राज्यातला एक प्रांत म्हणून राखून कैरो शहराला या प्रांताची राजधानी ठरवले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

रंग माझा वेगळा

वसंत ऋतूमध्ये सारी सृष्टी रंगांनी न्हाऊन निघते. गुलाबी काटेसावर, सोनेरी बहावा, सोनमोहोर, केशरी पळस, लालचुटुक गुलमोहर आणि पांगाऱ्याला बहर येतो. रानातून फिरताना सागाचे पान चुरले की हात लालेलाल होतो, मोहाची आणि कुसुमाची कोवळी पालवी पाहून सृष्टीतल्या चित्रकाराविषयी कुतूहल वाटते. जाणून घेऊ या अशा कोणत्या रसायनांमुळे हा चमत्कार घडून येतो? नसर्गिक रंगांचा उपयोग करून वस्त्रे रंगवण्याची कला पुरातन आहे. काही झाडे आणि त्यापासून मिळणाऱ्या नसर्गिक रंगांमध्ये आढळणारे सहा मुख्य प्रकारचे रासायनिक घटक खालीलप्रमाणे आहेत.

१. काळा कुडा आणि नीळ या झाडांमधल्या इंडिगोटीनमुळे सुंदर निळा रंग बनतो.

२. मंजिष्ठामधल्या अलिझारीन या अ‍ॅन्थ्राक्विनोनमुळे गडद लाल रंग मिळतो.

३. मेंदी (२- हायड्रोकसी नॅप्थाक्विनोन) आणि अक्रोडाच्या सालीमध्ये असलेल्या (५- हायड्रोकसी नॅप्थाक्विनोनमुळे) लालसर केशरी रंग मिळतो

४. कमला पळस फुलांचा पिवळा रंग फ्लेवोनोनमुळे  येतो.

५. गाजर, पारिजातकाच्या फुलांचे देठ आणि शेंदरीच्या बीमधल्या कॅरोटिनमुळे पिवळा रंग येतो.

६. बाभूळ आणि खैराच्या सालीमधल्या टॅनीनमुळे  लालगडद रंग येतो.

७. पळसाच्या फुलांमधल्या ब्युटीन या रंगद्रव्यामुळे केशरी रंग तयार होतो आणि याच केशरियाने राजस्थानमध्ये होळी साजरी होते.

८. बारतोंडीच्या  कोवळ्या मुळापासून  अळता (मोरींडोन) नावाचा पिवळसर लाल रंग मिळतो.

९. नसर्गिक रंगांना पक्के करण्यासाठी त्यांची काही विशिष्ट धातूंबरोबर रासायनिक अभिक्रिया करावी लागते. उदा. मोरींडोनचा अ‍ॅल्युमिनियम धातूशी संयोग झाल्यास पिवळसर लाल, क्रोमियम धातूशी संयोग झाल्यास चॉकलेटी आणि लोहाशी संयोग झाल्यास काळपट जांभळी छटा मिळते.

१०. क्लोरोफिल (अ,ब,क,ड) या हरितद्रव्यांमुळे पानाच्या हिरव्या रंगामध्ये वैविध्य येते. संत्री, टोमॅटोसारखी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये बीटा कॅरोटीन असते तर हळदीचा पिवळा रंग कुरकुमीन नावाच्या पॉलिफिनोलमुळे येतो. कुरकुमीनचा रंग (सामू) नुसार आम्लामध्ये पिवळा तर अल्कामध्ये लाल होतो.

११. अन्थोसायानीन या फ्लेवोनोईडचा रंगही स्र्ऌ(सामू) नुसार बदलून लालसर निळ्या रंगांची अनेक फुले पाने रानावनात दिसतात.

१२. बीट रूट आणि लाल माठाच्या भाजीमधले बीटानिन सामुनुसार रंग बदलून गुलाबी जांभळ्या रंगाच्या छटा मिळतात. आहे ना मजेदार सृष्टीचे रसायनशास्त्र!

 

 

सुगंधा शेटय़े (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org