माणसाच्या शरीराची हालचाल होण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका असते, ती हाडातल्या सांध्यांची! मग ती हाताची, बोटांची, पायांची, गुडघ्यांची, कोणतीही असेल! वयोमानाप्रमाणे, सांध्याच्या हाडांची झीज होते, ती गुडघ्यातल्या सांध्याच्या हाडांची! गुडघ्याच्या दोन हाडांमध्ये असलेल्या मऊ ऊतींची झीज झाल्यामुळे, हाडं हळूहळू एकमेकांवर घासली जातात. त्यामुळे सांध्याच्या सभोवताली असलेल्या मांसल पेशीना सूज येते. चालताना असह्य वेदना होतात. याला सांधेदुखी किंवा संधिवात म्हणतात.
यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करताना, शास्त्रज्ञांनी औषधांमध्ये सोन्याचा उपयोग करण्याचा प्रयोग केला. एकोणिसाव्या शतकात जर्मन जीवाणूतज्ज्ञ (बॅक्टेरियोलॉजिस्ट) रॉबर्ट कॉक याने, सोन्याचा अंश असलेलं औषध, क्षयरोग म्हणजे टीबी निर्माण करणार्या जीवाणूंसाठी घातक असतं, असा शोध लावला. पुढे १९१९ मध्ये फ्रेंच डॉक्टर फॉरेस्टियर यांनी सांधेदुखीवरच्या औषधांमध्ये गोल्ड सॉल्ट्स म्हणजे सोन्याच्या क्षारांचा वापर करण्यास सुरुवात केली. हे क्षार स्नायूंमध्ये टोचल्यामुळे, सांधेदुखी कमी होते असं आढळून आलं. १९३२ मध्ये त्यांनी याबाबतचा अधिकृत अहवाल ‘द लँसेट’ या वैद्यकीय मासिकात प्रकाशित केला. सोन्याचं इंजेक्शन, हे संधिवात विरोधी औषध म्हणून काम करतं आणि शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीची क्रिया कमी करून, सांधे खराब होण्याचा धोका टाळायला मदत करतं असं नमूद केलं.
मुख्यत: सांधेदुखी नियंत्रणात न आल्यामुळे म्हणजे जेव्हा वेदनाशामक औषधांचा परिणाम होत नाही आणि सांधे सुजून निकामी व्हायला लागतात, तेव्हा हे औषध दिलं जातं. जे सांध्यामधली सूज कमी करून, हाडांची झीज रोखायला मदत करतं. यामुळे आजार पूर्णपणे बरा होत नाही, पण त्याची तीव्रता रोखली जाते. हे इंजेक्शन ठरावीक कालावधीनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली तयार करून स्नायूमध्ये दिलं जातं.
गुडघेदुखी ही ऑस्टिओआर्थरायटीस म्हणजे वाढत्या वयामुळे हाडांची झीज आणि रूमेटाइडआर्थरायटीस म्हणजेच रोगप्रतिकारक शक्तीच सांध्यावर घाला घालते; अशा दोन प्रकारांत मोडते. यावरील उपचारसुद्धा क्रायसो थेरेपी म्हणजे सोन्याची इंजेक्शन्स किंवा अर्थोपेडिक सर्जरी किंवा औषधांमध्ये सुईचा वापर न करता देण्यात येणारे इंजेक्शन या दोन प्रकारात मोडतात. पर्यायी औषध म्हणजे इंजेक्शनऐवजी ‘ऑरेनोफिन’ नावाचं सोन्याचं औषध गोळ्यांच्या स्वरूपातही उपलब्ध आहे. लहान मुलांना सुईची भीती वाटते, वेदना होतात, संसर्गाचा धोका असतो त्यामुळे एका विशिष्ट उपकरणाच्या साहाय्याने हे औषध दिलं जातं. सुईऐवजी उच्चदाबाच्या पेनसदृश जेटद्वारे, औषध त्वचेखाली सोडलं जातं. सांध्याच्या दुखण्यांवर सोन्याच्या इंजेक्शनचा प्रभावी उपाय होतो, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनाखालीच ती घ्यावीत हे निश्चित!
- उर्मिला फडके
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
