मोठमोठ्या गवताळ कुरणांनी आणि जंगलांनी व्याप्त असलेल्या कझाकस्तानच्या भूप्रदेशात मध्ययुगीन काळाच्या सुरुवातीस वस्ती केली ती सिथीयन्स ऊर्फ शकांच्या भटक्या टोळ्यांनी, तुर्की पशुपालन करणाऱ्या भटक्या जमातींनी. पुढे या तुर्की वंशाच्या जमातींची लहान लहान राज्ये या प्रदेशात तयार झाली. १३ व्या शतकात मंगोल साम्राज्याचा प्रमुख चेंगीज खान याने या प्रदेशातल्या छोट्या राज्यांवर आक्रमण करून या प्रदेशावर आपला ताबा बसविला. १६व्या शतकात कझाख जमातींच्या लोकांच्या वस्त्यांमध्ये बरीच भर पडून तत्पूर्वीच्या शक आणि मंगोल लोकांवर कझाख लोकांचे वर्चस्व वाढतच गेले. १८व्या शतकाच्या सुरुवातीस या प्रदेशात रशियन लोकांचा प्रवेश झाला आणि कझाख लोकांच्या लहान खानेट राज्यांचा प्रभाव कमी होऊन एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत कझाकस्तानचा संपूर्ण ताबा रशियनांकडे येऊन तो रशियन साम्राज्याचाच एक भाग बनला. कझाकस्तानच्या प्रदेशात १७३१ साली रशियन लोकांचा प्रवेश झाला. त्या काळात या प्रदेशात कझाख लोकांचे तीन प्रमुख झुजेस म्हणजे जमाती होत्या आणि त्यांचे खानेत म्हणजे छोटी राज्ये होती. या खानेतवर मंगोल टोळ्या हल्ले करीत, अशा वेळी हे खानेत रशियन साम्राज्याची मदत घेत आणि त्यातून हस्तक्षेप करता करता रशियन साम्राज्याने हा प्रदेश पुरता आपल्या ताब्यात आणला. त्याचप्रमाणे १७ व्या शतकात मध्य आशियात कामिक या नावाचे बौद्ध राज्य होते, त्यालाही ही तीन खानेत खंडणी देत असत. आठव्या  शतकात या प्रदेशात काही अरब आले त्यांनी येथे इस्लाम रुजविला. रशियन साम्राज्याचा भाग बनल्यावर कझाकस्तानच्या प्रदेशात अनेक रशियन, कुटुंबांनी स्थलांतर केले. रशियन झार सरकारने येथे किल्ले बांधले, रशियन कुटुंबांना जमिनी दिल्या. १८९० पासून झारशाहीने कझाख लोकांच्या सुपीक जमिनी, गवताळ पठारे रशियन शेतकऱ्यांना देऊन तिथे शेती सुरू केली आणि या प्रदेशात कझाखना त्यांच्या मेंढ्या वगैरे प्राण्यांना चरण्यास बंदी तर घातलीच परंतु या भटक्या लोकांना तिथे प्रवेशबंदी घातली. कझाख टोळ्यांना त्यामुळे दुसरीकडे स्थलांतर करावे लागले. या लोकांच्या विस्थापित होण्याचे आणि उपासमारीचे पडसाद १९१६ साली पहिल्या महायुद्ध काळात उमटायला सुरुवात झाली. कझाखांनी रशियन शाही फौजेत भरती होण्याविरुद्ध बासमाची या चळवळीत सक्रिय भाग घेतला. – सुनीत पोतनीस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

sunitpotnis94@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kazakhstan in the russian empire akp
First published on: 20-10-2021 at 00:13 IST