कुप्पलि वेंकटप्पा पुटप्पा (१९६७)

एकूण तिसऱ्या क्रमांकाचे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक ‘कुवेंपु’ या नावाने ओळखले जातात.

भारतीय ज्ञानपीठाचा १९६७चा सर्वश्रेष्ठ साहित्य पुरस्कार डॉ. कुप्पलि वेंकटप्पा पुटप्पा यांना त्यांच्या ‘श्रीरामायण दर्शनम्’ या कन्नड महाकाव्यासाठी प्रदान करण्यात आला. १९३५ ते १९६० या कालावधीत भारतीय भाषेतील प्रकाशित सर्जनात्मक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृतीबद्दल देण्यात आला. १९६७चा ज्ञानपीठ पुरस्कार, गुजराती लेखक उमाशंकर जोशी यांच्यासह विभागून देण्यात आला.

कन्नड भाषेचे पहिले आणि एकूण तिसऱ्या क्रमांकाचे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक ‘कुवेंपु’ या नावाने ओळखले जातात. महाकवी, राष्ट्रकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वचिंतक, समीक्षक, विज्ञाननिष्ठ अशा अनेक अंगांनी कुवेंपु यांचा कन्नड साहित्य आणि कर्नाटकावर प्रभाव पडलेला दिसून येतो.

कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्य़ातील तीर्थहळ्ळी तालुक्यातील माळेनाड क्षेत्रातील कुप्पळ्ळा गावी एका प्रतिष्ठित, सुसंस्कृत कन्नड भाषिक घरात २९ डिसेंबर १९०४ रोजी त्यांचा जन्म झाला. पुटप्पांचे व्यक्तिमत्त्व देखणे, प्रभावी होते. राहते घर, भरपूर शेतीवाडी, अशा सधन, समृद्ध कुटुंबात त्यांचा जन्म झाला.  १९१८ मध्ये हायस्कूलच्या शिक्षणासाठी ते म्हैसूरला आले. या शहरी वातावरणात, शाळेपेक्षा ते सार्वजनिक वाचनालयातच जास्त वेळ रमत. इंग्रजी वाचनाने ते विलक्षण प्रभावित झाले. या काळातच त्यांनी शेक्सपीअरपासून टॉलस्टॉयपर्यंत, सगळ्या महान साहित्यकारांच्या साहित्याचे पारायण केले. रामकृष्ण परमहंस आणि  विवेकानंद यांच्या जीवनाचाही परिचय झाला. वर्डस्वर्थ हा त्यांचा आवडता कवी. याच शालेय वर्षांमध्ये ‘कुवेंपु’ यांनी इंग्रजीत काव्यरचना करायला सुरुवात केली.  इंग्रजीबरोबर कन्नड साहित्याचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचायला सुरुवात केली. व्यासांचे ‘महाभारत’ त्यांच्या अत्यंत आवडीचे महाकाव्य होते. शालेय शिक्षणानंतर त्यांनी ऐच्छिक विषय म्हणून ‘विज्ञान’ घेतले आणि ‘तत्त्वज्ञान’ विषयात बी.ए. केले. एम.ए. झाल्यावर म्हैसूर विद्यापीठात ते कन्नड शिकवू लागले. १९५५-५६ मध्ये ते महाराजा कॉलेजचे प्राचार्य होते. १९५६-६० या कालावधीत ते म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. या सर्व शैक्षणिक प्रवासात त्यांचे काव्यलेखन सुरू होते.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

 

बोफोर्ट मापनश्रेणी

विशिष्ट दिशेने होणारी हवेची हालचाल म्हणजे वारा. वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. वाऱ्याची दिशा आणि गती मोजण्यासाठी वातदिशादर्शक आणि वायुवेगमापक वापरला जातो. वातदिशादर्शकामध्ये वाऱ्याची दिशा दाखवण्यासाठी मुक्तपणे फिरू शकेल अशी धातूची पट्टी असते. वारा ज्या दिशेला वाहतो आहे, त्या दिशेकडे दिशादर्शकाचं टोक वळतं आणि आपल्याला वाऱ्याची दिशा समजते.

डॉप्लर रडारच्या मदतीने जसा ढगांचा अभ्यास करून पावसासंबंधी अंदाज बांधले जातात, त्याचप्रमाणे वाऱ्याचा वेग समजण्यासाठी या रडारचा वापर केला जातो.

तुमच्या सभोवताली असणाऱ्या झाडांचं, त्यांच्या पानांचं निरीक्षण करून त्यांच्या हालचालींवरून वाऱ्याची गती आणि दिशा याविषयी तुम्ही अंदाज बांधू शकता. पानांची सौम्य हालचाल मंद वारा वाहत असल्याचं दर्शवतात, तर जोरदार वारा वाहायला लागला तर संपूर्ण झाड हलत असल्याचं दिसतं.

समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांची अनेक निरीक्षणं घेऊन अ‍ॅडमिरल फ्रान्सिस बोफोर्ट यांनी १८३३ साली सागरी वाऱ्यांची तीव्रता किंवा वेग ठरवणारी एक मापनश्रेणी निश्चित केली.

सागरी वाऱ्यांच्या निरनिराळ्या वेगाकरिता त्यांनी विशिष्ट संकेतांक  (Standard Letter Code     किंवा  LC) ठरवले. त्या काळच्या ब्रिटिश आरमार खात्याने १८३८ साली बोफोर्ट मापनश्रेणीला अधिकृत मान्यता दिली. १८६२ साली म्हणजे बोफोर्ट यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी जागतिक व्यापार मंडळाने या मापनश्रेणीचा उपयोग संभाव्य वादळी वाऱ्यांचे आगाऊ इशारे देण्यासाठी उपयोग करण्यास सुरुवात केली.

या मापनश्रेणीनुसार अजिबात वारा वाहत नसेल तर छउ -0 हा संकेतांक असतो. जसजसा वाऱ्याचा वेग आणि तीव्रता वाढत जाते, तसतसा संकेतांक वाढत जातो. उदाहरणार्थ, हलका वारा असेल तर  छउ – 1, वाऱ्याची झुळूक आली तर छउ – 2, जोराचा वारा असेल तर  छउ -4;  तर वादळी वारा असेल तर  छउ – 7 हा संकेतांक असतो.

मच्छीमारांना व सागरी प्रवाशांना धोक्याची सूचना देण्यासाठी या श्रेणीनुसार विशिष्ट  खुणेचे बावटे लावले जातात. आजही बोफोर्ट मापनश्रेणी  थोडय़ाफार फरकाने वापरली जाते.

हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kuppali venkatappa puttappa