समुद्रजलाचे महत्त्वपूर्ण रासायनिक वैशिष्टय़ म्हणजे क्षारता आणि सामू (पी.एच.) मूल्य! समुद्रात राहणाऱ्या सजीवांवर सामू मूल्याचा प्रभाव पडत असतो. समुद्रजलाचे आम्लीय किंवा आम्लारीय स्वरूप हे सामू मूल्यावर अवलंबून असते. प्रदूषणविरहित नैसर्गिक शुद्ध पेयजलाचे सामूमूल्य साधारणत: ७.२ ते ७.३ इतके असते. सुमारे २०० वर्षांच्या (१७५१-१९९६) दीर्घ कालावधीत समुद्राच्या पृष्ठजलाचे सामूमूल्य ८.२५ वरून ८.१४ पर्यंत ०.११ने घटल्याची नोंद आहे. कोणत्याही द्रवाचे सामूमूल्य कमी झाले की त्याचे आम्लीय गुणधर्म वाढतात.
विविध कारणांमुळे वातावरणात उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडपैकी सुमारे ३० टक्के कार्बन डायऑक्साइड समुद्रजलात शोषला जातो आणि त्यामुळे समुद्रजलाचे आम्लीकरण होते. जेव्हा समुद्रजलात कार्बन डायऑक्साइड विरघळतो तेव्हा पाण्याबरोबर त्याची अभिक्रिया होऊन काबरेनिक आम्ल (H2 CO3) तयार होते. अशा प्रकारे तयार झालेल्या काबरेनिक आम्लाच्या रेणूंचे विघटन होऊन ऋणभारित बायकाबरेनेट आयन (HCO3-) व धनभारित हायड्रोजन (H ) आयनमुक्त होतात. धनभारित हायड्रोजन (H) आयनांमुळे पाण्याचे सामूमूल्य घसरते व त्याचे आम्लीय गुणधर्म वाढतात. जेव्हा सामूमूल्य एक एककाने (युनिट) कमी होते तेव्हा त्यातील धनभारित हायड्रोजन (H ) आयनचे प्रमाण दहापटीने वाढलेले असते. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडच्या वाढत्या प्रमाणाबरोबर समुद्रजलाच्या आम्लीकरणाचा वेग नि:संशय वाढतच जाणार.




उपलब्ध माहितीनुसार समुद्रजलाचे वर्ष २०२० मध्ये नोंदविलेले सामूमूल्य ८.१ आहे. म्हणजेच १९९६च्या तुलनेत हे सामूमूल्य कमी झालेले आहे. समुद्रजलाच्या आम्लीकरणाचे विपरीत परिणाम त्यात सजीवांवर होतात. भूपृष्ठापासून सागरतळापर्यंत विविध खोलींवर निरनिराळय़ा प्राणी आणि वनस्पतींचा अधिवास असतो. आम्लीकरणामुळे कवचधारी सजीवांच्या कवचाची जाडी व काठिण्यता कमी होणे, तसेच प्रजनन क्षमता कमी होणे असे परिणाम प्रामुख्याने दिसतात. याशिवाय असंख्य सागरी सजीवांच्या दैनंदिन शारीरिक क्रिया, चयापचय क्रिया मंदावणे आणि रोगप्रतिकारक क्षमता क्षीण होणे असे गंभीर परिणामदेखील समुद्रजलाच्या आम्लीकरणामुळे होतात. समुद्रजलाच्या निरंतर आम्लीकरणामुळे अन्नसाखळी व अन्नजाळे यावर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे सागरी परिसंस्थेचे अस्तित्व धोक्यात येऊन जैवविविधता नामशेष होण्याचा धोका निर्माण होतो. याशिवाय मासेमारी, पर्यटन अशा सागरआधारित व्यवसायांवर अनिष्ट प्रभाव पडत आहे. हे आम्लीकरणामुळे होणारे भयानक परिणाम रोखण्यासाठी वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे जागतिक उत्सर्जन प्रमाण ५० टक्क्यांनी कमी होण्याची गरज ‘इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’च्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.