रंगांच्या शास्त्राचा पाया घालणारे अल्बर्ट हेन्री मुन्शेल हे पेशाने चित्रकार होते. त्यांचा जन्म १८५८ मध्ये बोस्टन येथे झाला. मॅसेच्युसेट्सच्या ‘नॉर्मल आर्ट स्कूल’मधून पदवी घेतल्यावर तेथेच ते प्राध्यापक झाले. रंग चित्रकार म्हणून त्यांची समुद्राधिष्ठित चित्रे आणि व्यक्तिचित्रे विशेष लक्षणीय ठरली. मुन्शेल ‘कलर कॉम्पोझिशन’ आणि ‘आर्टिस्टिक अ‍ॅनाटोमी’ हे विषय शिकवीत असत. रंग मांडणीच्या अशास्त्रीय पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या रंगांच्या आकलनात अडथळा येतो असे त्यांच्या निदर्शनास आले. हाडाचे शिक्षक असल्यामुळे रंग सादरीकरणात आणि रंग निर्देशनात शास्त्रशुद्ध अचूकपणा आणण्याचा त्यांनी ध्यास घेतला, अथक परिश्रम केले. फोटोमीटर तयार करून वेगवेगळ्या रंगांच्या परावर्तित प्रकाशाचे मापन केले. या सर्व प्रवासात त्यांनी अमेरिकेत पाच पेटंटदेखील मिळवली. १९०४ मध्ये त्यांनी ‘कलर एज्युकेशन प्रायमर’ तयार केला, जो वापरून कलेच्या विद्यार्थ्यांना रंगांबद्दलची तार्किक माहिती व शिक्षण देणे शक्य झाले.

या सगळ्या प्रयत्नांचा कळस ठरले ते वर्ष १९०५, जेव्हा त्यांचे पहिले पुस्तक ‘ए कलर नोटेशन’ प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या अद्वितीय अशा ‘मुन्शेल कलर ऑर्डर सिस्टीम’चा सर्वागाने ऊ हापोह केला. रंगांचे दृश्यसंकेत ग्रा धरून या पद्धतीत रंगांचे त्रिमिति आयोजन केले जाते. त्यानुसार ‘ह्यु’ (एच), ‘व्हॅल्यू’ (व्ही) आणि ‘क्रोमा’ (सी) यांच्या साहाय्याने रंग मांडला व दर्शविला जातो; आणि ‘एचव्ही/सी’ हा रंगाचा निर्देशांक मानला जातो. मुन्शेल यांची ही पद्धती अलौकिकच म्हणावी लागेल, जी कला आणि शास्र यांचा दुवा बनली आहे! शास्रज्ञ ही पद्धत वापरून निर्देशन पद्धतीत बदल न करता नवनवीन रंग या पद्धतीत समाविष्ट करू शकतात, तर दुसरीकडे शास्रीय पार्श्वभूमी नसूनसुद्धा कलाकार ही पद्धती रंगांची निवड व तुलना करण्यासाठी सहज वापरू शकतात. ही पद्धती रंगमापनाच्या क्षेत्रात पायाभूत ठरली व सर्व नवीन मानदे याच पद्धतीवरून पुढे आली.

१९१५ साली त्यांचे ‘अ‍ॅटलास ऑफ दि मुन्शेल कलर सिस्टीम’ हे पुस्तक प्रकाशित झाले. १९१७ मध्ये त्यांनी ‘मुन्शेल कलर कंपनी’ स्थापन केली. १९१८ मध्ये त्यांचे देहावसान झाले. त्यांचे तिसरे पुस्तक ‘ग्रामर ऑफ कलर’ १९२१ मध्ये प्रकाशित करण्यात आले.कला क्षेत्रात (चित्रकला, संगीत) प्रावीण्य असणारे शास्रज्ञ खूप आहेत; पण एका कलाकाराने रंग शास्रासाठी एवढे मोठे योगदान दिल्याचे हे बहुदा एकमेव उदाहरण असावे.

— डॉ. विनीता दि. देशपांडे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ: www.mavipa.org