scorecardresearch

कुतूहल : अ‍ॅल्युमिनिअम का गंजत नाही?

आपल्या दैनंदिन जीवनात लोखंड, अ‍ॅल्युमिनिअम, तांबे इत्यादी धातूंपासून बनवलेल्या वस्तू आपण वापरतो.

कुतूहल : अ‍ॅल्युमिनिअम का गंजत नाही?

विजय लाळे

आपल्या दैनंदिन जीवनात लोखंड, अ‍ॅल्युमिनिअम, तांबे इत्यादी धातूंपासून बनवलेल्या वस्तू आपण वापरतो. लोखंडापासून बनवलेल्या वस्तू कालांतराने गंजलेल्या आढळतात. लोखंड गंजण्याच्या प्रक्रियेला इंग्रजी भाषेत ‘रिस्टग’ म्हणतात, तर ‘गंज’ म्हणजे आयर्न ऑक्साइड. हे लालसर-तपकिरी रंगाचे संयुग असून हवा आणि पाणी यांच्या उपस्थितीत लोखंड आणि ऑक्सिजन यांच्या रासायनिक अभिक्रियेतून तयार होते. लोखंडाचा गंज सामान्यपणे पत्र्यासारखा पातळ आणि रवाळ असतो. गंजल्यामुळे लोखंडाची झीज होते. इतर काही धातूंचीही याच प्रकारे झीज होते, पण त्याला गंजणे म्हणत नाहीत. प्रत्येक धातूच्या गंजाचे स्वरूप वेगवेगळे असून त्यांपैकी काही डोळय़ांनी ओळखता येतात तर काही स्पेक्ट्रोस्कोपी तंत्राने ओळखता येतात.

गंजाच्या इतर स्वरूपात लोखंड आणि क्लोरिन यांच्या अभिक्रिया येतात, ज्या ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत घडतात. उदाहरणार्थ, पाण्याखालील काँक्रीटच्या खांबांमध्ये असे लोखंड वापरतात ज्यावर तारेचा पीळ दिलेला असतो. पाण्याखाली असलेल्या या लोखंडावर हिरव्या रंगाचा गंज चढतो. हे आयर्न हायड्रॉक्साइड असते. लोखंडाच्या बाबतीत ‘गंजणे’ हा गुणधर्म कमीपणाचा असला, तरी गंजाचा अजून एक विशिष्ट प्रकार आहे. त्याला ‘स्थिर गंज’ म्हणता येईल. त्यामुळे लोखंडाच्या पृष्ठभागावर एक गंजरोधी थर तयार होतो. परंतु लोखडांवरील हा थर अ‍ॅल्युमिनिअमच्या पृष्ठभागावरील अ‍ॅल्युमिनिअम ऑक्साइडच्या थराएवढा संरक्षक नसतो.

अ‍ॅल्युमिनिअम हे मूलद्रव्य, लोखंड तसेच पोलाद यांच्याप्रमाणे गंजत नाही. अ‍ॅल्युमिनिअमचा पृष्ठभाग अ‍ॅल्युमिनिअम ऑक्साइडच्या थरामुळे (जो नैसर्गिकरीत्या तयार होतो) सुरक्षित राहतो. या थरामुळे पृष्ठभागाखालचे अ‍ॅल्युमिनिअम, पाणी आणि ऑक्सिजनच्या संपर्कात येत नाही. म्हणूनच अ‍ॅल्युमिनिअमपासून बनविलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात. विमाने सतत पाऊस, हिम व धुके यांच्यात असूनही ती गंजलेली दिसत नाहीत.

संशोधकांना असे आढळले आहे की, पाणी जेव्हा धातूच्या ऑक्साइडच्या संपर्कात येते तेव्हा पाण्यामुळे धातूच्या पृष्ठभागाच्या संरचनेत बदल होतो. उदाहरणार्थ, अ‍ॅल्युमिनिअम ऑक्साइडमध्ये, अ‍ॅल्युमिनिअम आणि ऑक्सिजन यांचे अणू एकमेकांना बंधांनी जोडलेले असतात. जेव्हा अ‍ॅल्युमिनिअम ऑक्साइड आणि पाणी यांचा संपर्क होतो तेव्हा अ‍ॅल्युमिनिअम आणि ऑक्सिजन यांच्या अणूंमधील अंतर वाढते. त्यामुळे अ‍ॅल्युमिनिअमच्या पृष्ठभागावरील थराची संरचना बदलते. परिणामी अ‍ॅल्युमिनिअम ऑक्साइडची क्रियाशीलता कमी होते. त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजन किंवा पाणी यांच्याबरोबर अ‍ॅल्युमिनिअमची क्रिया वेगाने होत नाही. म्हणूनच अ‍ॅल्युमिनिअम ऑक्साइडमुळे अ‍ॅल्युमिनिअम धातूची झीज होत नाही.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 00:03 IST

संबंधित बातम्या