Premium

कुतूहल : आंतरगुही प्राणी

आंतरगुही संघातील प्राण्यांचे वर्गीकरण हायड्रॉईड, जेलीफिश आणि प्रवाळ व समुद्र फुल अशा तीन गटांत केले जाते.

kutuhal

डॉ. नंदिनी विनय देशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरगुही संघातील प्राण्यांचे वर्गीकरण हायड्रॉईड, जेलीफिश आणि प्रवाळ व समुद्र फुल अशा तीन गटांत केले जाते. यांच्यात असलेल्या दंशपेशींमुळे हे प्राणी आपल्या आसपासच्या छोटय़ा भक्ष्यांना विष टोचून अचेतन करतात. त्याचप्रमाणे स्वसंरक्षणासाठी देखील यांचा वापर करतात. क्वचित मानवाला देखील यांच्यामुळे विषबाधा होऊ शकते, त्यामुळे असे जीव असणाऱ्या किनाऱ्यांवर आपण खबरदारीने पावले टाकावीत! वालुकामय किनाऱ्यावर ‘सी एनिमोन’ची (समुद्र फुल) मोठय़ा प्रमाणात वस्ती सापडू शकते. फुलाच्या पाकळय़ांप्रमाणे शुंडके पसरून सी एनिमोन अन्नग्रहण करतो. प्रजनन करताना एकाचे दोन, दोनाचे चार अशा त्वरित होणाऱ्या अलैंगिक पद्धतीने यांची संख्या वाढते.

याच संघातील ताडगोळय़ांप्रमाणे दिसणाऱ्या घंटाकृती गोलाकार अशा ‘जेलीफिश’ची दहशत खूप असते. याच्या शरीरातील दंशपेशी इतक्या प्रभावी असतात की त्या पोहणाऱ्या माणसाला निमिषार्धात घायाळ करतात. ९५ टक्के पाण्यापासून तयार झालेले शरीर सांभाळत, एका मिनिटात १२० ते १५० वेळा शरीराचे आकुंचन करत जेलीफिश पोहत असतो. यांची संख्या अतिप्रमाणात वाढल्यास मच्छीमारांच्या जाळय़ांतील मोकळय़ा जागा बंद होतात. जेलीफिशसारखे दिसणारे इतर सागरी जीव परंतु ज्यांच्यात दंश पेशी नसतात, त्यांना ‘कोंब जेली’ असे म्हटले जाते. त्यांच्या ‘टीनोफोरा’ या संघातील १०० टक्के प्राणी सागरी अधिवासात असतात. सामान्य भाषेत यांना ‘सी गुजबेरी’ असेसुद्धा म्हणतात. बऱ्याचशा जेलीफिश आणि कोंब जेली यांना जैवदीप्तीचे वरदान असते. चुनखडीच्या कंकालापासून छोटे आंतरगुही प्राणी प्रवाळ वसाहती वसवतात. ‘सी पेन’ आणि ‘सी फॅन’ या प्रकारचे प्राणी समुद्रात एखाद्या वनस्पतीसारखे पसरतात. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात आंतरगुही संघातील विविध उमेदवार अद्यापही आढळून येतात. मुंबईत भविष्यात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सागरी स्मारकाच्या बेटाजवळ प्रचंड मोठय़ा आकाराचे सी फॅन आहेत.

हायड्रॉईड प्रकारच्या प्रजातींवर जपानच्या हिरोशीतो या सम्राटाने मोठय़ा प्रमाणात संशोधन केले. टोकियोमधील राजवाडय़ात या प्राण्यांवर संशोधन करण्यासाठी ते काही दिवस राखून ठेवले जात. १९६७ पासून त्यांनी लिहिलेल्या संशोधन पत्रिकांचा संच ‘सागामी उपसागरातील हायड्रॉईड’ या नावाने १९८८ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. यांच्या आजोबांच्या कालखंडात १८७५ मध्ये २.२३ मीटर लांबीचा सर्वात विशाल हायड्रॉइड जपानच्या किनाऱ्यावर सापडला होता.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kutuhal animals animal classification hydroids jellyfish groups ysh