समुद्र म्हणजे सजीवांच्या जैवविविधतेची खाणच! सागराच्या खारट पाण्यात असंख्य विषाणू, जिवाणू, आदिजीव, बुरशी, प्राणी आणि वनस्पती वास्तव्य करतात. सागरी सूक्ष्म जीव ऑक्सिजनची निर्मिती करतातच, शिवाय मोठय़ा प्रमाणात कार्बनचे शोषणही करत असतात. हे जीव किनाऱ्याचे संरक्षण करतात. प्रवाळासारखे सागरी जीव नवीन जमीन किंवा खडक तयार करण्यास मदत करतात. जलीय एकपेशीय वनस्पती सागरी परिसंस्थेत वाढतात.
प्राथमिक उत्पादक वनस्पतीप्लवक हे सागरी अन्नसाखळीचा पाया आहेत. त्यांचे भक्षण करून गुजराण करणारे प्राणीप्लवक असतात. सूक्ष्म जीव सुमारे ७० टक्के सागरी जैवभार म्हणजेच बायोमास निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात. समुद्र तळाशी अनेक विघटक जिवाणू असतात. काही जिवाणूंमध्ये जीवदीप्ती असते. किनाऱ्याने वाढणाऱ्या निमखाऱ्या पाण्यातील कांदळवनातील वनस्पती सागरी जीवांना पूरक पर्यावरण उपलब्ध करून देतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जलचर पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेतात. त्यासाठी त्यांच्यात अनुकूलन दिसून येते. माशांमध्ये कल्ले असतात. अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये विविध प्रकारची श्वसनेंद्रिये आढळतात. समुद्रातील सस्तन आणि सरीसृप प्राणी मात्र प्रत्येक श्वासासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. त्यांना पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन घेता येत नाही. फुप्फुसे असल्याने प्रत्येक श्वासासाठी त्यांना वर यावे लागते.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal article about marine animal life nature amy
First published on: 12-01-2023 at 02:17 IST