संधिपाद म्हणजेच ज्यांची चलनवलनाची उपांगे छोटय़ा सांध्यांनी जोडलेली असतात असे प्राणी. हा पृथ्वीतलावरील सर्वात मोठा प्राणिसंघ आहे. यातील ९० टक्के प्राणी कीटकवर्गातील असून इतर १० टक्क्यांपैकी काही पाण्यात आढळतात. त्यातील खाऱ्या-निमखाऱ्या पाण्यात राहणाऱ्या जीवांची माहिती घेणे महत्त्वाचे आहे. या संघात तीन गटांत (दोन उपसंघांत) सागरी प्राणी येतात. चेलीसराटा उपसंघ (वर्ग मेरीस्टोमाटा- उदा. नालधारी खेकडे व वर्ग पिक्नोगोनिडा- उदा. सागरी कोळी/ सुतेरे) आणि क्रस्टेशिया उपसंघातील (उदा. खेकडे, कोळंबी, शेवंड इ.) जीवांचे बाह्यकंकाल कायटीनयुक्त असते तर अंत:कंकाल नसते. बहुतांश प्राण्यांत डोके व धड (उदर) असून टोकाला ‘शेपटी’ असते. काहींना स्पृशा (मिशा) असतात. बहुतेक सजीव मुक्तपणे पोहतात, तर बार्नाकल्ससारखे काही समुद्रतळाला, होडीच्या पृष्ठावर वा इतर प्राण्यांच्या शरीराला चिकटून राहतात. निव्वळ वर्गीकरणाने या प्राण्यांचा खरा परिचय होत नाही. वर यादीत दिलेल्यांपैकी पहिला आहे नालधारी खेकडा. नावाने ‘खेकडा’ असला तरी विंचू-कोळी/ सुतेरे यांच्याशी साधम्र्य दर्शवतो. पृथ्वीतलावरील सर्वात प्राचीन सजीवांपैकी असलेला नालधारी खेकडा जवळपास सहा अब्ज वर्षांपासून अस्तित्वात आहे. तो समुद्रापेक्षा खाडीच्या पाण्यात जास्त आढळतो. जगातील मोजक्या ठिकाणी असणारा हा प्राणी भारतात बालासोर, ओडिशा येथे सापडतो. दुसरे उदाहरण सागरी कोळी. लांब, बहुसंख्यी, केसाळ पाय, अनेक संयुक्त डोळे, छोटय़ा नळीसारखे शुंड (प्रोबोसिस) असा दिसायला ‘गोजिरा’ असलेला हा कोळी प्रत्यक्षात मांसाहारी आहे आणि शरीर-आकाराच्या तुलनेत मोठे भक्ष्यही गट्टम करतो! खेकडे, कोळंबी, शेवंडी या मानवी अन्नातील प्रथिनयुक्त चवदार प्राण्यांच्या निर्यातीपासून बरेच परकीय चलन मिळते. कायटीनचा वापर औषधे, सौंदर्य प्रसाधनांत करतात. या संघातील प्राण्यांच्या शरीरातील जवळपास सर्व भाग उपयुक्त ठरतात. या शेवटच्या वर्गातील जवळा, करंदी व तत्सम ‘छोटे मियां’ उपयोगाच्या दृष्टीने ‘बडे मियां’ गणले जातात. संधिपाद प्राणी हे पाण्यातील भक्षक तसेच भक्ष्य बनून सागरी अन्नसाखळी, अन्नजाळे कार्यरत ठेवतात. कोळंबीसारख्यांची अतिरेकी शेती केली जाते, त्यामुळे भू- जल- वायू प्रदूषित झाल्याने यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. सारासार विवेकाने त्यांचे उपयोजन केले तर मानवाला लाभदायी ठरेलच, शिवाय ही गुणसंपन्न प्रजा समुद्रात व इतर जलाशयात सुखेनैव राहील. डॉ. प्रसाद कर्णिक, मराठी विज्ञान परिषद