अदिती जोगळेकर
शीत सागरी प्रवाह उच्च अक्षांशांकडून कमी अक्षांशांकडे वाहतात. साधारणपणे खोल समुद्रात आढळणारे हे प्रवाह ध्रुवीय प्रदेश आणि उपोष्ण कटिबंधातील पाणी विषुववृत्ताकडे वाहून आणतात. थंड पाणी हवेतील उष्णता ओढून घेते व हवेचे तापमान कमी करते. त्यामुळे हवेची जलधारण क्षमता घटते व किनाऱ्यावर पोहोचण्याआधीच समुद्रात पाऊस पडतो. परिणामी किनारपट्टीवरील हवामान थंड पण शुष्क आणि वाळवंटी होते. पेरू, चिली व नामिब वाळवंटे ही त्याची ठळक उदाहरणे आहेत.
कॅनडा आणि ग्रीनलँडजवळ लॅब्राडोर शीत प्रवाह आढळतो. आक्र्टिक समुद्रातून थंड पाणी वाहून आणणारा लॅब्राडोर प्रवाह दक्षिणेला गल्फ प्रवाहाला येऊन मिळतो. हे दोन प्रवाह जिथे एकत्र येतात तिथे जगातील काही सर्वाधिक समृद्ध मत्स्यक्षेत्रे आढळतात. लॅब्राडोर प्रवाहाच्या प्रभावामुळे किनारपट्टी भागातील उन्हाळे सौम्य व हिवाळे अधिक तीव्र होतात. लॅब्राडोर प्रवाहाबरोबर दक्षिणेकडे वाहून येणारे प्रचंड हिमनग मात्र सागरी वाहतुकीसाठी अडचणीचे ठरतात. हिमनगांमुळे अनेक वेळा जहाजांना मार्ग बदलावे लागतात. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यालगतचा कॅलिफोर्निया प्रवाह आणि रशियाच्या पूर्व किनाऱ्याजवळील ओखोस्तक प्रवाहदेखील मासेमारीसाठी फायदेशीर ठरतात. उत्तर अटलांटिक महासागरातील कॅनरी हा महत्त्वाचा प्रवाह दक्षिणेला अगदी सेनेगलपर्यंत पोहोचतो. आक्र्टिक महासागरातून मोठय़ा प्रमाणात बर्फ वाहून आणणारा कॅनरी प्रवाह सहारा वाळवंटाच्या उष्णतेचा प्रभाव सौम्य करतो. तसेच जैवविविधतेसाठीही तो पूरक ठरतो.
याचप्रमाणे दक्षिण गोलार्धातील बेंग्वेला शीत प्रवाह आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकापासून विषुववृत्तापर्यंत वाहतो. पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणारा हा प्रवाह दक्षिण-अटलांटिक आवर्ताचा भाग आहे. बेंग्वेला प्रवाहाचे कमी लवणतेचे आणि पोषकद्रव्यांनी समृद्ध पाणी हजारो प्रकारच्या प्लवक, मासे आणि सागरी पक्ष्यांच्या वाढीसाठी पूरक ठरते. दक्षिण आफ्रिका, नामिबिया, अंगोला या देशांमधील मासेमारी व्यवसाय बेंग्वेला प्रवाहामुळे बहरला आहे.
दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर, चिलीच्या दक्षिण टोकापासून पेरूच्या उत्तर किनाऱ्यापर्यंत हम्बोल्ट प्रवाह वाहतो. हम्बोल्ट प्रवाहाद्वारे थंड पाणी दक्षिण ध्रुवापासून विषुववृत्ताकडे येते. पोषकद्रव्ये असलेल्या थंड पाण्यामध्ये प्लवक मुबलक प्रमाणात वाढत असल्याने जलचरांना भरपूर खाद्य मिळते आणि अन्य सागरी जीवांची पैदास चांगली होते. हम्बोल्ट प्रवाहामुळे गालापागोस बेटे आणि दक्षिण-अमेरिकेत मत्स्य व्यवसायाची भरभराट झाली आहे. याशिवाय फॉकलँड प्रवाह, अंटाक्र्टिक प्रवाह आणि दक्षिण ऑस्ट्रेलियन प्रवाह हे दक्षिण गोलार्धाचे हवामान प्रभावित करणारे शीत प्रवाह आहेत.