सागरी प्राणीजगतापैकी २३ टक्के सजीव मृदुकाय संघातील आहेत. अपृष्ठवंशीय प्राण्यांत सर्वाधिक सजीवापैकी हा दुसरा संघ! (पहिला संधिपाद संघ) आकार, शरीर रचना, अधिवास, वर्तन अशा अनेक बाबींत प्रचंड वैविध्य असणारे मृदुकाय, अकवचधारी (खोल समुद्रतळाशी असणारे अल्पसंख्य) ते बहुकवचधारी (खडकाळ किनाऱ्यालगत समुद्रतळाशी असणारे ‘कायटन्स’) अशा दोन टोकाच्या गटांत सात वर्गात विभागले आहेत. इतर वर्गापैकी उदरपाद (गोगलगाय प्रकारातील सागरी प्राणी उदा. शंख, समुद्रससे, समुद्रफुलपाखरे), द्वि-झडपी (शिंपले, तिसऱ्या- निव्वळ सागरी), शीर्षपाद (नळे, माकुले, ऑक्टोपस-अष्टशुंडकधारी इ. केवळ सागरी), नौकापाद (किनाऱ्यापासून दूर उथळ ते खोल समुद्रतळाशी आढळणारे हस्तिदंताकारी मृदुकाय) व एककवचधारी (जीवाश्म) रूपातील अस्तित्व मानले गेलेले खोल समुद्रतळाशी असणारे) हे होत. सागर किनाऱ्यावर पसरलेले शंख-शिंपले, जेवणाच्या ताटातल्या तिसऱ्या, शिणाणे, देवपूजेत वाजवला जाणारा शंख, मोती प्रदान करणारा पर्ल ऑयस्टर, विविध आकारातले नळ-माकूळ, असे अनेक मृदुकाय आपल्या परिचयातील आहेत. मृदुकाय गटातील अनेक प्राण्यांना शरीरावर कवच असते. हे कवच कायटीन व काँचिओलिन नावाच्या चुनखडीच्या मिश्रणाने घट्ट झालेल्या प्रथिनांपासून बनते. याचाही वापर मानवाने विविध कारणांसाठी केला आहे. ऑक्टोपससारख्या बुद्धिमान प्राण्याने कथा-कांदबरीत स्थान मिळवलेले आहे. संशोधन क्षेत्रात मृदुकाय प्राण्यांचा वापर केला जातो. हे सागरी जीव इतरांपेक्षा वेगळे भासतात. त्यांच्यात आंतरंगप्रावार (मॅन्टल) असते. काही जण याच्या उतीत शैवालाला आसरा देतात, त्यामुळे त्यांच्यात प्रकाश संश्लेषणाने स्वत:चे अन्न तयार करण्याची क्षमता येते. ‘गाळणी’ पद्धतीने अन्नग्रहण करणारे मृदुकाय प्राणी प्लवकांसारखे सूक्ष्मजीव, काही कीटक व इतर प्राणी भक्षितात. शीर्षपाद गटातील प्रतिनिधी मांसभक्षी असतात आणि दंतपट्टीऐवजी जबडा, शुंडके यांचा प्राथमिक वापर भक्ष्य पकडताना करतात. हे सारे सागरातील अन्नसाखळीचा तसेच समुद्र-पृष्ठ, तळ यात अधिवास करणाऱ्या सजीवांतील महत्त्वाचा दुवा आहेत. तसेच यांच्या अन्नसेवनाच्या तऱ्हा, उत्सर्जनाच्या क्रिया आणि कवचातील टणक द्रव्ये यांमुळे सागराचा तळ कायम राहण्यास व सेंद्रीयदृष्टय़ा संपृक्त राहण्यासाठी अहम भूमिका हे प्राणी बजावतात. मानवी अन्न, औषधे, शोभिवंत वस्तू आणि मोत्याची निर्मिती अशा अनेकविध मार्गानी यांचे आर्थिक महत्त्व वाढते. पर्यावरणीय, जैविक आणि आर्थिकदृष्टय़ा मोलाचे असे हे सागरी मृदुकाय. डॉ. प्रसाद कर्णिक,मराठी विज्ञान परिषद