सागरी प्राणीजगतापैकी २३ टक्के सजीव मृदुकाय संघातील आहेत. अपृष्ठवंशीय प्राण्यांत सर्वाधिक सजीवापैकी हा दुसरा संघ! (पहिला संधिपाद संघ) आकार, शरीर रचना, अधिवास, वर्तन अशा अनेक बाबींत प्रचंड वैविध्य असणारे मृदुकाय, अकवचधारी (खोल समुद्रतळाशी असणारे अल्पसंख्य) ते बहुकवचधारी (खडकाळ किनाऱ्यालगत समुद्रतळाशी असणारे ‘कायटन्स’) अशा दोन टोकाच्या गटांत सात वर्गात विभागले आहेत. इतर वर्गापैकी उदरपाद (गोगलगाय प्रकारातील सागरी प्राणी उदा. शंख, समुद्रससे, समुद्रफुलपाखरे), द्वि-झडपी (शिंपले, तिसऱ्या- निव्वळ सागरी), शीर्षपाद (नळे, माकुले, ऑक्टोपस-अष्टशुंडकधारी इ. केवळ सागरी), नौकापाद (किनाऱ्यापासून दूर उथळ ते खोल समुद्रतळाशी आढळणारे हस्तिदंताकारी मृदुकाय) व एककवचधारी (जीवाश्म) रूपातील अस्तित्व मानले गेलेले खोल समुद्रतळाशी असणारे) हे होत. सागर किनाऱ्यावर पसरलेले शंख-शिंपले, जेवणाच्या ताटातल्या तिसऱ्या, शिणाणे, देवपूजेत वाजवला जाणारा शंख, मोती प्रदान करणारा पर्ल ऑयस्टर, विविध आकारातले नळ-माकूळ, असे अनेक मृदुकाय आपल्या परिचयातील आहेत.
मृदुकाय गटातील अनेक प्राण्यांना शरीरावर कवच असते. हे कवच कायटीन व काँचिओलिन नावाच्या चुनखडीच्या मिश्रणाने घट्ट झालेल्या प्रथिनांपासून बनते. याचाही वापर मानवाने विविध कारणांसाठी केला आहे. ऑक्टोपससारख्या बुद्धिमान प्राण्याने कथा-कांदबरीत स्थान मिळवलेले आहे. संशोधन क्षेत्रात मृदुकाय प्राण्यांचा वापर केला जातो.
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal curiosity marine mollusks nature amy