प्रवाळांच्या वाढीसाठी भक्कम पाया आवश्यक असतो. समुद्रात ७० ते ८० मीटर खोलीवर असा पाया असल्यास वाढ चांगली होते. अशा पायावरून ऊध्र्व दिशेने सागरपृष्ठाकडे व खुल्या सागराच्या दिशेने त्यांची वसाहत वाढते. ते शीत सागरी प्रवाहांपासून दूर, उबदार पाण्यात वाढतात. प्रवाळांच्या वाढीसाठी २०-२८ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान आवश्यक असते. १८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात त्यांची योग्य वाढ होत नाही. मात्र ३० अंश उत्तर ते ३० अंश दक्षिण अक्षांशादरम्यान हे चांगले फोफावतात. म्हणूनच प्रवाळद्विपे उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात. सूर्यप्रकाशाची आवश्यकता असल्यामुळे ती जास्त खोल अप्रकाशीय थरांच्या पाण्यात जगू शकत नाहीत. समुद्रसपाटीपासून ६० ते ९० मीटर खोलीपर्यंतच प्रवाळ आढळतात. प्रवाळांच्या कठीण कवचाला अनेक छिद्रे असतात. या छिद्रांत गाळ साचतो व प्रवाळांचे जीवन नष्ट करतो. त्यामुळे गाळाचे संचयन किंवा गाळयुक्त समुद्र प्रवाह हे प्रवाळ वाढीला प्रतिकूल असतात. याउलट गाळविरहित स्वच्छ पाणी त्यांच्या वाढीस मदत करते. घट्ट व गुळगुळीत समुद्रतळ, पाण्याची सहज हालचाल व जोरदार भरती प्रवाह असणारे समुद्र विभाग, प्रवाळ वाढीला अनुकूल असतात. गोडे पाणी आणि कमी क्षारतेचे किंवा अतिक्षारतेचे पाणी प्रवाळ वाढीस घातक असते. कारण अशा पाण्यात कॅल्शिअम काबरेनेटचे प्रमाण कमी असते. नदीमुखाजवळ साठणारा गाळ प्रवाळ वाढीस धोकादायक असतो. त्यामुळेच प्रवाळ भित्तींची वाढ नदीमुखापासून दूर होते. सागरी प्रवाह आणि सागरी लाटा प्रवाळ वाढीस उपयुक्त असतात. त्यांच्यामुळेच प्रवाळ खडकांना विविध आकार येतात. प्रवाळांच्या वाढीसाठी ऑक्सिजनयुक्त पाणी आणि जैवशैवाल आवश्यक असते. प्रवाळांची वाढ खुल्या समुद्रात चांगली होते. विविध अन्नद्रव्ये मिळणाऱ्या प्रवाही भागांत ते चांगले वाढतात. जागतिक तापमानवाढीचा भीषण परिणाम प्रवाळांवर होतो. त्यामुळे प्रवाळ पांढुरकी पडतात. याला प्रवाळ विरंजन असे म्हणतात. जेव्हा पाणी खूप उष्ण होते तेव्हा प्रवाळांच्या ऊतीत वास्तव्य करणारे शैवाल बाहेर पडतात. असे प्रवाळ मृत नसते. परंतु शैवालाच्या अभावी अन्नपुरवठा कमी झाल्याने ते तणावग्रस्त होतात आणि कालांतराने नष्ट पावतात. प्रदूषित पाण्याचादेखील या सजीवांवर विपरीत परिणाम होतो. - दीपलक्ष्मी नारायण पुजारी,मराठी विज्ञान परिषद