चक्रीवादळे किती विनाशकारी असतात याची सर्वाना कल्पना आहे. काहींना अनुभवही असेल. चक्रीवादळांचे वैशिष्टय़ हे की, ती जमिनीवर निर्माण होत नाहीत. ती समुद्रावर निर्माण होऊन जमिनीवर येतात. ती समुद्रकिनारा ओलांडताना अतिशय जोरदार वारे वाहतात आणि प्रचंड पाऊस पडतो. चक्रीवादळे जमिनीवर निर्माण होत नाहीत. कारण त्यांना लागणारी ऊर्जा पुरवण्याची क्षमता जमिनीत नसते. ती केवळ उष्ण कटिबंधातील समुद्रांत असते. शीत कटिबंधातील समुद्रांवरदेखील चक्रीवादळे उद्भवत नाहीत. कारण ती तुलनेने थंड असतात.
चक्रीवादळांच्या निर्मितीसाठी समुद्रावर आधी अनुकूल परिस्थिती तयार व्हावी लागते. मुख्य म्हणजे सागरी तापमान किमान २७ अंश सेल्सिअस असावे लागते. त्याखेरीज समुद्रावर एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण व्हावे लागते. अशा कमी दाबाच्या क्षेत्राचे क्रमश: चक्रीवादळात रूपांतर होते. कधी कधी यासाठी ३-४ दिवस लागतात. चक्रीवादळाचे तीव्र किंवा अतिशय तीव्र चक्रीवादळात रूपांतर व्हायला आणखी १-२ दिवस लागतात.
भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडे अरबी सागर आणि पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे. हिवाळय़ात हे थंड असतात. पावसाळय़ातही विशाल मेघाच्छादनामुळे ते तापू शकत नाहीत. परिणामी एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या चार महिन्यांतच चक्रीवादळे निर्माण होऊ शकतात.आपल्याकडे दरवर्षी सामान्यत: सहा चक्रीवादळे निर्माण होतात, दोन अरबी सागरावर तर चार बंगालच्या उपसागरावर. अर्थात हे आकडे प्रत्यक्षात कमी-अधिक होत राहतात. ही सगळीच वादळे विक्राळ स्वरूप धारण करत नाहीत. सगळीच भारतावर येतात असेही नाही. बंगालच्या उपसागरावरील काही वादळे बांगलादेशकडे किंवा म्यानमारकडे जातात. तर अरबी समुद्रावरील काही वादळे पाकिस्तान किंवा ओमानच्या दिशेने जातात.
चक्रीवादळे जो मार्ग अवलंबतात त्यामागे सागरी तापमान आणि वातावरणाच्या उच्च स्तरांवरील वाऱ्यांची दिशा महत्त्वाची असते. चक्रीवादळांच्या मार्गावरील सागरी तापमान पुरेसे उष्ण नसेल तर त्यांची तीव्रता वाढू शकत नाही. कधी कधी उच्च स्तरीय वाऱ्यांच्या विरोधामुळे चक्रीवादळे उत्तरेकडे सरकू शकत नाहीत. मग ती भारताचा किनारा ओलांडतात. उलट कधी कधी उच्च स्तरीय वाऱ्यांचे त्यांना प्रोत्साहन लाभते. असे सर्व घटक लक्षात घेऊन चक्रीवादळांचे पूर्वानुमान केले जाते आणि ते बऱ्याच अंशी खरे ठरते. खबरदारीचे उपाय वेळीच करता येतात आणि प्राणहानी टाळता येते.
डॉ. रंजन केळकर
मराठी विज्ञान परिषद