एखादे स्थळ राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले की त्याचे वैज्ञानिक महत्त्व अधोरेखित होतेच; शिवाय त्या स्थळाचे संरक्षण करण्याचे बंधन शासनावर असते. त्यामुळे तेथील वैज्ञानिक आविष्काराला कोणतीही बाधा पोहोचणार नाही याची आपोआपच काळजी घेतली जाते. तेथील वैज्ञानिक आविष्कार पाहण्यासाठी लोक आवर्जून तेथे जाऊ लागतात. त्यामुळे विज्ञान लोकांपर्यंत पोहचते. शिवाय पर्यटनाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होतो.

अन्य वैज्ञानिक उद्यानांप्रमाणे भारतात काही जीवाश्म उद्यानेही आहेत. जीवाश्म म्हणजे केवळ निसर्गातली एक विस्मयकारक वस्तू नव्हे. पृथ्वीच्या इतिहासात अनेक प्रजाती उत्क्रांत झाल्या, सुखासमाधानाने नांदल्या आणि भूवैज्ञानिक कारणांनी पर्यावरणात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली म्हणून विलुप्तही झाल्या. सजीव कोणकोणत्या कारणांनी विलुप्त झाले त्याची माहिती आपल्याला जीवाश्मांच्या अभ्यासातून मिळते. सध्या मानवी हस्तक्षेपामुळे कित्येक प्रजातींचा अधिवास धोक्यात आला असल्याने जीवाश्मांवरील संशोधनाचे महत्त्व कोणाच्याही लक्षात येईल.

हिमालयाच्या पायथ्याकडील शिवालिक टेकडय़ांत बऱ्याच ठिकाणी पृष्ठवंशीय प्राण्यांचे आणि विशेषत: सस्तन प्राण्यांचे, जीवाश्म आढळतात. ते आपल्याला हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात साकेती गावाजवळच्या जीवाश्म उद्यानात पाहायला मिळतात. शिवालिक टेकडय़ांत सस्तन प्राण्यांच्या जीवाश्मांमध्ये खूप विविधता आहे, पण डायनोसॉरांचे जीवाश्म मात्र अजिबात मिळत नाहीत, यावरून ते जीवाश्म डायनोसॉर विलुप्त झाल्यानंतरच्या काळातले असावेत हे समजते.

गुजरातमध्ये गांधींनगरजवळ इन्द्रोडा आणि महीसागर जिल्ह्यातील रहियोली, अशा दोन ठिकाणी तसेच मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातही डायनोसॉरची अंडी आणि अन्य अवशेष सापडतात. या तिन्ही ठिकाणी डायनोसॉर जीवाश्म उद्यान आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात वडधमजवळ जीवाश्म उद्यान उभारणीचे काम सध्या सुरू आहे. वैज्ञानिकांनी वडधमजवळून डायनोसॉरांचे तसेच काही वनस्पतींचेही जीवाश्म गोळा केले आहेत.

भारतात वनस्पतींचे जीवाश्मही अनेक ठिकाणी आढळतात. जिथे वनस्पतींचे जीवाश्म विपुल प्रमाणात आढळतात किंवा महाकाय वृक्षांचे अश्मीभूत खोड मिळते, अशा काही ठिकाणी जीवाश्म उद्याने विकसित केली आहेत. बंगालमधील आमखोई येथे, राजस्थानमध्ये आकलजवळ, झारखंडच्या राजमहल टेकडय़ांमध्ये आणि तमिळनाडुमधील तिरूवकराई (जिल्हा – विलुपुरम) आणि सतनूर (जिल्हा – पेरंबळूर) येथे वनस्पती जीवाश्म उद्याने आहेत.

– डॉ. विद्याधर बोरकर, मराठी विज्ञान परिषद