तप्त उन्हाळा, तापलेली भेगाळलेली शेतजमीन हे ग्रामीण भागामधील निसर्गचित्र मान्सूनच्या पहिल्याच पावसाने पूर्ण बदलून वातावरण सुगंधी होऊन जाते, मग मनात कुतूहल निर्माण होते, काय आहे हा गंध? तो पहिल्याच पावसात का? या निसर्ग प्रक्रियेमध्ये काही विज्ञान आहे काय? आज विज्ञानानेच याचे ‘होय’ असे उत्तर दिले आहे.

पहिल्या पावसाच्या थेंबाचा तप्त मातीबरोबरच्या स्पर्शामधून निर्माण झालेल्या सुवासाची वैज्ञानिक ओळख जगाला करून देण्याचे श्रेय डॉ. इझाबेल (जॉय) बेअर आणि डॉ. रिचर्ड ग्रेनफेल थॉमस या दोन ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांना जाते. हे रहस्य शोधण्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशमधील कनोज शहरातील मातीपासून अत्तर तयार करण्याची पद्धत १९६० सालच्या सुमारास अभ्यासली. यामध्ये मातीच्या गोल चकत्यांना एप्रिल, मेच्या कडक उन्हामध्ये वाळवून पहिल्या पावसात भिजवतात आणि त्यानंतर त्यामधील गंध ऊध्र्वपातन पद्धतीने जमा करून तो चंदन तेलात मिसळतात. हेच ते मातीचे अत्तर. या दोन शास्त्रज्ञांनी ऑस्ट्रेलियामधील विविध प्रकारचे खडक, मातीचे नमुने उन्हाळय़ात गोळा करून अशाच प्रकारच्या सुगंधांची नोंद केली, त्याचे शास्त्रीय पृथक्करण करून सुवासास कारणीभूत ठरलेल्या प्रत्येक रासायनिक घटकाची अत्याधुनिक प्रयोगशाळेत ओळख पटवून त्यांचा सविस्तर अभ्यास केला. या तीन वर्षांच्या प्रदीर्घ अभ्यासावरील त्यांचे संशोधन ‘नेचर’ या जगविख्यात विज्ञान पत्रिकेत १९६४ साली प्रसिद्ध झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लेखात या शास्त्रज्ञांनी भारतामधील कनोजच्या मातीच्या अत्तराबद्दल सविस्तर लिहिले आहे. मातीच्या या सुवासास त्यांनी ‘पेट्रीकोर’ हे नाव दिले.

नंतर कृषी शास्त्रज्ञांनी सिद्ध केले की या सुवासामागे जमिनीमध्ये असलेल्या मातीमधील स्ट्रेप्टोमायसिस या तंतूमय जिवाणूंचे मोठे कार्य आहे. उन्हाळय़ात जेव्हा जमीन तापते तेव्हा स्ट्रेप्टोमायसिस जिवाणूंचे तंतू वाळून जातात, पण ते नष्ट होण्यापूर्वी ते टरपीनयुक्त लाखो बीजाणू तयार करून जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत राहतात, जेव्हा मान्सूनचा पहिला पाऊस या कोरडय़ा मातीवर तडतडत पडतो तेव्हा त्याला प्रतिसाद देत हे हजारो बीजाणू या टरपीनच्या गंधासह हवेत उधळले जातात आणि परिसरात मंद सुवास पसरतो. मातीच्या या गंधास जिओस्पिन असेही म्हणतात.

प्रदूषित हवेमधून पडणारा पाऊस आम्लधर्मीय असतो जो या जिओस्पिनचे विघटन करतो आणि सुवास नष्ट होतो. मातीचा सुगंध ही शेतजमीन सुपीक असल्याची पावती आहे. ज्या जमिनीत वनस्पतींचे अवशेष असतात ती जमीन पावसाळय़ात जास्त गंधमय होते. निसर्ग आणि विज्ञान यांच्या मैत्रीमधील हा गोड सुवास अत्तराच्या फायापेक्षा निश्चितच चांगला नव्हे काय?

नागेश टेकाळे, मराठी विज्ञान परिषद