scorecardresearch

कुतूहल : आखात, उपसागर व कालवे

सागर किंवा महासागराचा जमिनीकडे आत घुसलेल्या जलभागाला ‘आखात’ (गल्फ) असे म्हणतात.

कुतूहल : आखात, उपसागर व कालवे
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

डॉ. किशोर पवार

सागर किंवा महासागराचा जमिनीकडे आत घुसलेल्या जलभागाला ‘आखात’ (गल्फ) असे म्हणतात. हा प्रदेश तिन्ही बाजूंनी वा अंशत: भूवेष्टित असून अरुंद मुखाचा असतो. विस्तार मात्र मोठा असून त्याची खोली खूप असते. आखाताचे पाणी खारट असते. किनारा दंतुर असल्याने आखात जलवाहतुकीस योग्य असते.

आखाते सामान्यपणे लगतच्या सामुद्रधुनीने समुद्र वा महासागराशी जोडलेली असतात. उदा. सुएझ, आकाबा, एडन येथील आखात व जगातील सर्वात मोठे मेक्सिकोचे आखात. प्रत्येक आखाताचे भूशास्त्रीय स्वरूप, तळाची रचना, आकार, विस्तार, खोली, पाण्याचे गुणधर्म, आदींत भिन्नता आढळते. आखातांची निर्मिती भूकवचातील हालचालींमुळे झालेली आढळते. आपल्याकडील आखाते म्हणजे गुजरातच्या किनाऱ्यावरचे कच्छचे व खंबायतचे आखात तर भारत-श्रीलंकेच्या दरम्यानचे नैसर्गिक मोती- उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले मनारचे आखात. खंबायतच्या आखाताला साबरमती, मही, नर्मदा व तापी या नद्या मिळतात.

तिन्ही बाजूला जमीन असलेल्या समुद्राच्या विशाल जलाशयाला उपसागर (बे) असे म्हणतात. उदा. बंगालचा उपसागर, हडसनचा उपसागर. हा एक रुंद पण लहानसा समुद्रच असतो. भारत-बांगलादेश आणि म्यानमार यांच्या भूमीने वेढला गेलेला, जगातील उपसागरांपैकी सर्वात विस्तीर्ण असा बंगालचा उपसागर हा हिंदी महासागराच्या ईशान्येकडील भाग व्यापतो. भारतातील गंगा, ब्रह्मपुत्र, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी व इरावती इ.मोठय़ा नद्या या उपसागराला मिळतात. मासेमारीसाठी हा उपसागर उपयुक्त असून तळाशी मँगनीज खनिजे आहेत.

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाणी वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आलेला कृत्रिम मार्ग म्हणजे ‘कालवा’ (कॅनॉल). निचरा, सिंचाई, जलविद्युत निर्मिती व वाहतुकीचे जलमार्ग असे कालव्यांचे चार प्रकार पडतात. जगातील गजबजलेल्या जलमार्गापैकी एक असा १६५ कि.मी. लांबीचा सुएझ कालवा हा उत्तरेकडील भूमध्य समुद्र व दक्षिणेकडील तांबडा समुद्र यांना जोडतो. या कालव्यामुळे जहाजांना अटलांटिक महासागरातून भूमध्य समुद्र, तांबडा समुद्र व अरबी समुद्रमार्गे थेट हिंदी महासागरात जाता येते. कील कालवा हा उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्र यांना जोडणारा जर्मनीतील कालवा. मध्य अमेरिकेतील पनामा कालवा हा अटलांटिक व पॅसिफिक महासागरांना जोडणारा पाणशिडीच्या तत्त्वावर बांधलेला कालवा १५ ऑगस्ट १९१४ रोजी जहाज वाहतुकीस खुला करण्यात आला.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या