scorecardresearch

कुतूहल : उष्ण झऱ्यांचे तापमान!

खडकांची विशिष्ट रचना, आजूबाजूचा परिसर आणि हवामान या साऱ्यांचा परिणाम होऊन, उष्ण पाण्याच्या झऱ्यांची निर्मिती होते.

कुतूहल : उष्ण झऱ्यांचे तापमान!

डॉ. मानसी राजाध्यक्ष

पृथ्वीच्या पाठीवर काही ठरावीक ठिकाणीच उष्ण पाण्याचे झरे आढळतात. त्यामागे भौगोलिक कारणे असतात. खडकांची विशिष्ट रचना, आजूबाजूचा परिसर आणि हवामान या साऱ्यांचा परिणाम होऊन, उष्ण पाण्याच्या झऱ्यांची निर्मिती होते. पाण्याचा, उष्णता शोषण्याचा गुणधर्मही या गोष्टीला कारणीभूत असतो.

उष्ण पाण्याच्या झऱ्यांच्या उष्णतेचा प्रमुख स्रोत कोणता? एक तर पृथ्वीच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी ज्वालामुखी आहेत, तिथे लाव्हारसामुळे तापलेले खडक, अगदी पृथ्वीच्या वरच्या स्तरांमध्येच असू शकतात. या तापलेल्या खडकांच्या आजूबाजूने झिरपणारे पावसाचे पाणी, ही उष्णता शोषून घेते आणि तिथे उष्ण पाण्याचे झरे उगम पावतात. ही झाली ज्वालामुखींच्या आजूबाजूच्या भागातील परिस्थिती! पण जिथे पृथ्वीच्या वरच्या स्तरांमध्ये लाव्हारसाची हालचाल होत नाही, तिथेही खूप खोलवर खडकांखाली तप्त लाव्हा आहेच. जेवढी खोली जास्त तेवढे तापमान अधिक! तेव्हा अशा काही  ठिकाणी खडकांना असलेल्या भेगांमधून पावसाचे पाणी खोलवर जाते आणि गरम झाल्यावर पुन्हा वरच्या दिशेने सरकत, पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन दाखल होते. 

 पृथ्वीच्या पोटामध्ये असलेली उष्णता ही काही प्रमाणात तप्त लाव्हामुळे असली तरी, ती बऱ्याचशा प्रमाणात, पृथ्वीच्या पोटात असलेल्या किरणोत्सारी खनिजांमुळेही असते. अगदी ज्या भागात ज्वालामुखीचा मागमूसही नसतो, त्या भागातही पोटॅशियम, युरेनियम, थोरियम यांसारख्या काही मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी समस्थानिकांमुळे, उष्णता निर्माण होते. अर्थात किरणोत्सारामुळे निर्माण होणारी उष्णता हळूहळू वाढत जाते आणि अगदी सावकाशपणे पृथ्वीच्या थरांत पसरत जाते. ज्वालामुखीच्या तापमाननिर्मितीच्या तुलनेने, किरणोत्सारी खनिजांचा तापमान निर्माण करण्याचा वेग कमी असला तरी, खडकांमधील बरीचशी उष्णता ही किरणोत्सारी खनिजांमुळेच निर्माण होते.

आपण स्नानासाठी वापरतो ते गरम पाणी साधारणपणे ४० अंश सेल्शिअसच्या आसपास असते. उष्ण पाण्याच्या झऱ्यांचे पाणी मात्र ३५ ते ४० अंश सेल्सिअस ते अगदी ८० ते १०० अंश सेल्सिअसपर्यंतही उष्ण असू शकते. काही ठिकाणी तर अगदी १३० ते १४० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असलेल्या पाण्याचे छोटे तलावही आढळतात. उष्ण पाण्याच्या झऱ्यांमध्ये स्नान केले की बाह्य शरीर स्वच्छ होते म्हणतात. पण त्यासाठी सर्वात आधी, त्या झऱ्याच्या पाण्याचे तापमान समजून घेणे गरजेचे आहे. नाही तर शरीर स्वच्छ होण्याऐवजी भाजले जाईल. शिवाय रक्तदाब किंवा हृदयविकार असलेल्या काही व्यक्तींना, पाणी थोडे जरी जास्त गरम असेल, तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यातही ते पाणी आम्लधर्मी आहे की अल्कलीधर्मी हेही जाणून घेणे आवश्यक असते.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या