डॉ. नंदिनी वि. देशमुख
समुद्रकाठावर दिसणारी वाळू निरनिराळय़ा रंगांची असते. विषुववृत्तीय बेटांवर पांढरीधोप तर हवाईसारख्या ठिकाणी काळी, हिरवी, लाल अशा मिश्र स्वरूपाची असते. बम्र्युडाला गुलाबी वाळू दिसते. मात्र आपल्याकडे बहुतेक ठिकाणी वाळू खाकी रंगाची असते. प्रत्येक किनाऱ्याची वाळू हे त्याचे स्वत:चे वैशिष्टय़ असते. जमिनीवरच्या खडकांची धूप होऊन वाळू तयार होते. कालप्रवाहात पाऊस, पाणी, हिम, वारे, उष्णता, थंडी, झाडांची मुळे, प्राण्यांचा वावर होत होत वाळू तयार होत जाते. अर्थात ही प्रक्रिया घडायला हजारो वर्षे लागतात. लाटांचे तडाखेदेखील वाळू निर्मितीत हातभार लावतात.
वाळूचे स्वरूप विविध प्रकारचे असले तरी मूलत: त्यात सिलिका (सिलिकॉन डायऑक्साईड) क्वार्टझच्या स्वरूपात असते. त्या खालोखाल कॅल्शिअम काबरेनेट असते. वालुकामय किनाऱ्यावर क्वार्टझ आणि फेल्ड्स्पार ही दोन खनिजे प्रामुख्याने दिसतात. क्वार्टझ खनिजावर आयर्न ऑक्साईडची छटा असल्यामुळे वाळू खाकी रंगाची दिसते. तर फेल्ड्स्पारमुळे तिला राखाडी रंग चढतो. ज्या प्रदेशात ज्वालामुखी असतात त्या ठिकाणची वाळू रंगीत दिसते. लोहाचे प्रमाण जास्त असलेली वाळू तांबडी दिसते, तर ऑलिवीन खनिजाच्या उपस्थितीत वाळू हिरवी भासते. ज्वालामुखीपासून निघणारे खनिज ऑब्सीडीन असेल तर असे किनारे काळय़ा वाळूचे होतात.
जमिनीची धूप होऊन वाळू तयार होत असली तरी काही प्रमाणात वाळू समुद्रातूनदेखील येते. विविध सागरी प्राण्यांचे शंख, शिंपले किनाऱ्यावर लाटांतून वाहून येतात. लाटांच्या माऱ्याने त्यांचे छोटे छोटे तुकडे होऊन किनाऱ्यावर विखुरतात. विषुववृत्तीय प्रदेशात प्रवाळ भित्तिकांपासून देखील वाळू तयार होते. प्रवाळ भित्तिकेवर अनेक सजीव अन्नासाठी येत असतात. त्यातीलच एक ‘पोपट मासा’ प्रवाळाचे मोठाले तुकडे मोडतो. यातला अनावश्यक भाग विष्ठेवाटे वाळू होऊन बाहेर पडतो. अशा रीतीने पोपट मासा वर्षांकाठी शेकडो किलो वाळू तयार करतो. वाळूत फोरामिनिफेरा नावाचे एकपेशीय सजीव असतात. अमिबाप्रमाणेच यांचा समावेश प्रोटीस्टा या सृष्टीत केला जातो. त्यांची सुरक्षा कवचे कॅल्शिअम काबरेनेटची असतात. वाळू सूक्ष्मदर्शकाखाली तपासली तर त्यात अशा अनेक सजीवांचे कण दिसतात.
गेल्या ५० कोटी वर्षांपासून अस्तित्वात असलेली आणि आजही आपण मनसोक्त वापर करत असलेली वाळू हा मौल्यवान साधन संपदेचा स्रोत आहे. तरीही मानव दरवर्षी बांधकामासाठी ५० अब्ज टन वाळूचा वापर करतो, हे टाळायला हवे.