सुनीत पोतनीस
पृथ्वीच्या अंतरंगात चाललेल्या विविध हालचालींमुळे भूकवचात लहानमोठय़ा भेगा, छिद्रे आणि नलिका तयार होतात. भूपृष्ठावरील पाणी यांतून झिरपते आणि पुढे भूपृष्ठाखालील अतितप्त शिलारसाच्या संपर्कात आल्याने ते काही वेळा ४०० अंश सेल्सिअसपर्यंत प्रचंड तापते. हे उष्ण पाणी भूकवचातील भेगा आणि छिद्रांमधून मोठय़ा दाबाने उत्सर्जित होते. त्याला आपण उष्ण पाण्याचे झरे म्हणतो. समुद्रतळातून भेगा, छिद्रे, नलिका यांतून बाहेर पडलेल्या उष्ण सागरी पाण्यास ‘सागरी उष्णजलीय निर्गम मार्ग’ (हायड्रोथर्मल व्हेंट) म्हणतात.
सागर तळाशी असलेल्या ज्वालामुखीच्या संपर्कात आल्याने भूपृष्ठाखाली अति तप्त सागरी पाण्यात गंधक व काही खनिजे विरघळून जाऊन ते पाणी सतत बाहेर येत असते. या पाण्यात मिसळलेल्या खनिजांचे थर हजारो वर्षांच्या कालावधीत छिद्रे, नलिकांभोवती जमा होऊन खनिजांची नलिका तयार होते. अशा नलिकामार्गातून येणाऱ्या पाण्यात आयर्न सल्फाइड मिश्रित काळे गडद गरम पाणी उत्सर्जित होते. त्यामुळे त्यांना काळी धुरांडी (ब्लॅक स्मोकर्स) म्हणतात. काही धुरांडी खडकांमधील बेरियम, कॅल्शियम, सिलिकॉनमिश्रित पांढुरक्या रंगाचे उष्ण पाणी बाहेर टाकतात, त्यांना श्वेत धुराडी म्हणतात.
उष्णजलीय निर्गम मार्गाचे वैशिष्टय़ म्हणजे या ऊर्जा स्रोतामुळे येथे उष्ण सागरी पाण्यात जिवाणूची निर्मिती झाली आहे. हे जिवाणू जमीन व उष्ण पाण्याचे झरे यांपेक्षा सर्वस्वी वेगळे आहेत. या जिवाणूवर जगणारी एक पूर्ण नवी परिसंस्था या भागात विकसित झालेली आहे. काही मीटर आकाराचे वलयांकित कृमी या जिवाणूवर जगतात. यांच्या आश्रयाने राहणारे खेकडे, काही कंटकचर्मी यांची परिसंस्था सूर्यप्रकाशावर अवलंबून असलेल्या कोणत्याही परिसंस्थेपेक्षा वेगळी आहे. या परिसंस्थेतबाबत विशेष गोष्ट म्हणजे या संजीवांची विकरे (एनझाईम्स) शंभर अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानास कार्यक्षम राहतात. अशा सजीवांना ‘चरम सीमा सजीव’ (एक्स्ट्रीमोफाईल्स) असे म्हणतात. या सजीवांची अन्न साखळी इतर कोणत्याही ठिकाणी सापडू शकत नाही. यातून बाहेर पडणारा खनिज मिश्रित काळा भडक, उष्ण द्रव म्हणजे समुद्र तळातील असंख्य जलचरांसाठी अन्नाची खाणच बनलेली आहे.