दर्यावर्दी मोहिमांची सुरुवात करण्याचा हेतू केवळ सागरी महामार्ग आणि विभिन्न प्रदेश शोधणे इतकाच सीमित नव्हता. १७६८ सालापासून या मोहिमांचा अभ्यासासाठीही वापर सुरू झाला. ‘रॉयल’ नावाचे खगोलशास्त्रज्ञ आणि काही सागरी जीवशास्त्रज्ञ यांनी कॅप्टन जेम्स कुक याच्या आधिपत्याखाली ‘एन्डेव्हर’ नावाच्या बोटीवरून प्रवास सुरू केला. त्याच्यानंतर १८३९ साली अंटाक्र्टिकचा शोध घेण्यासाठी ‘एरेबस’ आणि ‘टेरर’ या दोन मोहिमा हाती घेण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येक शोधमोहिमेत सागरी जीवशास्त्रज्ञांची भरतीकेली गेली.
१८३१मध्ये चार्ल्स डार्विन हे एचएमएस बीगल या बोटीतून, १८४६ मध्ये थॉमस हक्सले एचएमएस रॅटल स्नेक या बोटीतून तर १८६० मध्ये वेलीच हे एचएमएस बुलडॉग या बोटीतून मोहिमांत सहभागी झाले. हे सर्व नामांकित जीवशास्त्रज्ञ होते. या प्रत्येक शास्त्रज्ञाने जीवशास्त्रातील अनेकविध प्रकारची माहिती आणि सिद्धांत प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या कामानंतर अनेक शास्त्रज्ञांनी खोल समुद्रातील सजीव सृष्टीकडे आपला मोर्चा वळवला.
एचएमएस लाइटिनग आणि एचएमएस फोर पॉइंट या बोटींतून १८६८ मध्ये हाती घेण्यात आलेल्या मोहिमांत निसर्गतज्ज्ञ, सागरी जीवशास्त्रज्ञ आणि समुद्र संशोधक असे सर्वच सहभागी झाले. याच मोहिमेनंतर एका अत्यंत महत्त्वाच्या सागरी मोहिमेचा पाया घातला गेला, ती म्हणजे एचएमएस चॅलेंजर्स शोधमोहीम. या मोहिमेतून समुद्रविज्ञानाविषयी अतिशय महत्त्वाची माहिती पुढे आली. पुढे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत शास्त्रज्ञांनी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि भूस्तर मंचावर आढळणाऱ्या सजीवांचा सखोल अभ्यास सुरू केला तो याच मोहिमेच्या पायावर.
मोनॅको देशाचा राजपुत्र प्रिन्स अल्बर्टदेखील अनेक शास्त्रीय शोधमोहिमांवर जात असे. ‘प्रिन्स आलीस’ नावाच्या शिडाच्या होडीवरून त्यांनी जगभर प्रवास केला. जपानचे सम्राट हिरोहितो यांनीदेखील समुद्राचा सखोल अभ्यास करून अनेकविध प्राण्यांच्या प्रजाती शोधून काढल्या. त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव या प्रजातींना देण्यात आले आहे. एडवर्ड फॉक्स नावाच्या शास्त्रज्ञांनी सागरी जीवन समुद्राच्या उभ्या पट्टय़ात कसे पसरले आहे, याच्याविषयीची माहिती प्रसिद्ध केली. या शोधमोहिमा केवळ भौतिक आणि रासायनिक अभ्यासापुरत्याच सीमित नव्हत्या. निरनिराळय़ा प्रजाती किती खोलीवर आढळतात हेदेखील त्यातून स्पष्ट झाले.
चॅलेंजर मोहीम इतकी विस्तृत होती की त्यातील संपादित ज्ञानावर आधारित शोधपत्रिकांची २९ हजार ५०० पाने, ५० खंड, तीन हजार आकृत्यांसहित प्रसिद्ध झाले. त्यातील शेवटचा अहवाल १८९५ साली छापण्यात आला. या मोहिमेत एक हजार ७१५ नव्या जाती आणि चार हजार ४१७ नव्या प्रजाती शोधून काढल्या गेल्या.
-डॉ. नंदिनी विनय देशमुख,मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org