scorecardresearch

कुतूहल : परग्रहावर जीवसृष्टी

माती हा जीवसृष्टीचा मूलाधार आहे. या मातीच्या सूक्ष्म कणांच्या पृष्ठभागावर सूक्ष्म जीव विविध प्रकारची रासायनिक स्थित्यंतरे घडवून आणत असतात.

माती हा जीवसृष्टीचा मूलाधार आहे. या मातीच्या सूक्ष्म कणांच्या पृष्ठभागावर सूक्ष्म जीव विविध प्रकारची रासायनिक स्थित्यंतरे घडवून आणत असतात. या जैवरासायनिक क्रिया जीवसृष्टीच्या अस्तित्वाचे खरे साक्षीदार आहेत. या सूक्ष्म कणांवर सुरू असलेल्या रासायनिक प्रक्रियांचा परिणाम मात्र वैश्विक असतो. कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी संशोधनाचे एक तंत्र आहे. यात प्रामुख्याने चार गोष्टींचे मापन केले जाते.

१. मातीत संख्येने किंवा आकाराने वाढणारा असा एखादा घटक आहे का?

२. मातीत एखादा जननक्षम घटक आहे का?

३. मातीत एखाद्या प्रकारची जैवरासायनिक क्रिया घडते आहे का?

४. मातीत प्रकाशसंश्लेषण क्रिया शक्य आहे का?

माणूस चंद्रावर उतरून तिथल्या मातीचे नमुने पृथ्वीवर घेऊन आला. अद्याप माणूस मंगळावर उतरूही शकलेला नाही. मंगळावर वायकिंग, फोनिक्स, क्युरिओसिटी अशा यानांनी तेथे पाठवलेल्या जीवरसायन प्रयोगशाळेतच मातीचे नमुने उबवून तीन प्रयोग केले. चंद्राच्या मातीत जीवाच्या अस्तित्वाचा कुठलाच पुरावा मिळाला नाही. परंतु मंगळाच्या मातीत मात्र जीवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळतील अशी मानवाला आशा होती. मंगळावर तीन प्रयोग केले गेले. पहिला प्रयोग होता प्रकाशसंश्लेषण क्रियेसंदर्भात मातीचे विश्लेषण. पृथ्वीवरील प्रकाशसंश्लेषण करणारे जीव पुरातन समजले जातात. त्यांना आर्किबॅक्टेरिया असे म्हणतात. किरणोत्सारी कार्बन डायऑक्साइड वापरून त्याचे पिष्टमय पदार्थात रूपांतर होते का? झाल्यास त्याचे ७०० अंश सेल्सिअस तापमानला खंडन होऊन किरणोत्सारी कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो का, हे बघितले गेले. दुसऱ्या प्रयोगात कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, मिथेन, हायड्रोजन, ऑक्सिजन असे वायू तसेच १९ विविध अमिनो आम्ल व जीवनसत्त्वांचा वापर करून ते मातीतील जैवरासायनिक क्रियेत कितपत सहभागी होतात याचा अभ्यास केला गेला. यासाठी वायुविच्छेदन यंत्राचा वापर केला गेला. तिसरा प्रयोग होता चयापचय क्रियेचे विश्लेषण. पृथ्वीवरील जीव ज्या मूलभूत घटकांवर जगतो त्याच घटकांवर मंगळावरील जीव जगतो का? यात विविध प्रकारची खाद्ये मातीत मिसळून ती ११ दिवस उबवली गेली. जर मातीतील जीव ते खाद्य वापरू शकला तर अर्थातच कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडावा, अशी अपेक्षा होती. निष्कर्ष असा निघाला की मंगळाच्या मातीत पेरॉक्साइडचे प्रमाण असून तिन्ही प्रयोगांतील क्रिया या रासायनिक होत्या, जैवरासायनिक नव्हत्या. परग्रहावर अद्याप तरी जीवसृष्टीचे पुरावे मिळालेले नाहीत.

– डॉ. रंजन गर्गे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kutuhal life planet life clay surface subtle organism chemical ysh

ताज्या बातम्या