scorecardresearch

कुतूहल : चुंबकीय दगड..

नेहमी उत्तर दिशा दाखवणारे चुंबकसूचीचे टोक अचानक दक्षिण दिशा दाखवायला लागले तर? तुम्हाला ही एखाद्या परीकथेत शोभणारी अद्भूत घटना वाटेल.

कुतूहल : चुंबकीय दगड..
कुतूहल : चुंबकीय दगड..

हेमंत लागवणकर, मराठी विज्ञान परिषद

नेहमी उत्तर दिशा दाखवणारे चुंबकसूचीचे टोक अचानक दक्षिण दिशा दाखवायला लागले तर? तुम्हाला ही एखाद्या परीकथेत शोभणारी अद्भूत घटना वाटेल. पण पृथ्वीचे चुंबकीय बल झुगारणारे दगड संशोधकांना सापडले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहेकर तालुक्यात लोणार इथे उल्कापातामुळे तयार झालेले आघाती सरोवर आहे. या सरोवराभोवतीच्या वनक्षेत्रात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. यापैकी कमळजा देवीच्या मंदिरामध्ये सरोवराच्या बाजूकडे असलेल्या व्हरांडय़ात चुंबकसूची ठेवली तर ती उत्तर-दक्षिण दिशेत स्थिर न राहता वेगळी दिशा दाखवते. तर काही ठिकाणी ती गरगर फिरून स्थिर होते. याचा अर्थ कमळजा देवीच्या मंदिरातले काही दगड हे चुंबक पाषण आहेत, पण ते पृथ्वीचे चुंबकीय बल झुगारून देतात.

धुळय़ाजवळ पिंपळनेर गावातल्या माळरानावर २००५ मध्ये काही संशोधकांना असाच एक अनोखा दगड सापडला. या दगडामध्येदेखील पृथ्वीच्या चुंबकीय बलाला झुगारून देण्याची ताकद आहे. या दगडावर होकायंत्र ठेवले की त्यातली चुंबकसूची पटकन १८० अंशातून फिरते आणि नेहमी उत्तर दिशा दाखवणारे चुंबकसूचीचे टोक दक्षिण दिशा दाखवते. निसर्गामध्ये असे अनोखे दगड सापडणे ही एक दुर्मीळ घटना असल्याचे संशोधकांचे मत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून अनेक वेळा पृथ्वीच्या चुंबकीय बलाची दिशा बदलली आहे. अनेकदा पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव विरुद्ध झाले आणि पुन्हा पूर्ववतसुद्धा झाले. याचे पुरावे प्राचीन चुंबकाश्मांमध्ये पाहायला मिळतात.

अनेक खडकांमध्ये लोखंडाची खनिजे असतात. या खनिजांमध्ये चुंबकीय गुणधर्म असण्याची शक्यता असते. लाव्हारस थंड होत असताना ही खनिजे तयार होण्यास सुरुवात होते. अर्धवट द्रवरूपात असलेल्या या खडकांमध्ये तयार होणारी ही चुंबकीय खनिजे तरंगत्या अवस्थेत असताना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी स्वत:ला जुळवून घेतात. खडक पूर्णपणे थंड झाला की त्यातील चुंबकीय पदार्थाच्या रेणूंची संरचना त्या वेळी असलेल्या पृथ्वीच्या चुंबकीय बलाला अनुसरून होते. लोणार सरोवराच्या परिसरात आढळणारे चुंबकाश्म, तसेच पिंपळनेर इथे आढळलेला चुंबकीय दगड हे असेच प्राचीन चुंबकाश्म आहेत. 

पृथ्वीचे चुंबकीय बल जसे बदलत गेले तसे प्राचीन चुंबकाश्मांचे गुणधर्मसुद्धा बदलत जातात. मात्र, असे चुंबकाश्म क्युरी तापमानापर्यंत चांगले भाजले गेले तर त्यांना मूळचे चुंबकीय गुणधर्म प्राप्त होऊ शकतात. पिंपळनेर येथे सापडलेल्या प्राचीन चुंबकाश्मावर विजेचा लोळ पडून तो चांगला भाजला जाऊन त्याला त्याचे मूळचे चुंबकीय गुणधर्म प्राप्त झाले असल्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या