सध्या चारही बाजूने विकास प्रकल्पांच्या विळख्यात अडकलेल्या, अंदाजे १५० किलोमीटरचा किनारा लाभलेल्या मुंबईची भौगोलिक रचना पूर्वी अशी नव्हती. काही बेटांना जोडून, त्यांमधील समुद्रामध्ये भर घालून, सध्याची मुंबई अस्तित्वात आली. त्या काळी मुंबईभोवती असलेल्या सागरी अधिवासाचा अभ्यास करून अभ्यासकांनी त्यांचे अहवाल सादर केले आहेत. या किनाऱ्यानजीक नवीन सागरी प्रजाती शोधल्या गेल्या, त्यांतील काही प्रजाती येथील स्थानिक प्रजाती असल्याचेही कळले. मुंबईच्या पश्चिमेला अरबी समुद्र तर पूर्वेला ठाणे खाडी आणि मुंबईचे नैसर्गिक बंदर आहे. मुंबई किनारपट्टीमध्ये खारफुटी, खडकाळ आणि वालुकामय समुद्रकिनारे यांचा समावेश होतो. पूर्वी आढळणारे अनेक समुद्री जीव आजही या किनाऱ्यांवर आढळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खडकाळ किनाऱ्यांवर विविध प्रकारची कालवं, शंख-शिंपले, समुद्र फूल, खेकडे, सी-फॅन, प्रवाळिभती तयार करणारे प्रवाळ, अनेक प्रकारचे अपृष्ठवंशीय प्राणी यांचा वावर असतो. नेव्ही नगर आणि हाजी अलीच्या किनाऱ्यांवर फॉल्स पिलो प्रवाळ, फ्लॉवरपॉट प्रवाळ यांना पोषक अधिवास आहेत. प्रियदर्शनी पार्कच्या किनाऱ्यावर अरबी कवडी, सी-अर्चिन मोठय़ा प्रमाणात आढळतात. बऱ्याच वेळा फ्लॅट वर्म, समुद्री गोगलगाई (सी स्लग) यांसारखे रंगीबेरंगी जीव भरती-ओहोटी क्षेत्रामध्ये पोहताना दिसतात. गिरगाव आणि जुहू चौपाटीवर खेकडे, समुद्र पुष्प, शंख आणि ऑक्टोपसची अंडीसुद्धा आढळतात.

शंख-शिंपले, खेकडे, समुद्री गोगलगाई, निवटी, चिखल शेवंडा (मड-लॉबस्टर) यांसारख्या विविध प्राण्यांचा कांदळवन हा अधिवास आहे. त्यांच्यावर अवलंबून असलेले अनेक पक्षी शिवडी आणि ठाणे खाडीत स्थलांतर करतात. त्याचप्रमाणे, गादा किंवा गादा-रेडा या नावाने ओळखला जाणारा हम्पबॅक डॉल्फिनसुद्धा मुंबई किनारी सामान्यत: आढळतो.

आजही मुंबईचे किनारे आणि येथील जीव हे बऱ्याच लोकांच्या अन्नसाखळीचा भाग आहेत आणि उपजीविकेचे साधनही! असे असूनही आपण या जैवविविधतेची काळजी घेत नाही. मुंबईच्या शिंपल्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळून आले, ज्याचा अन्नसाखळीतून मानवी शरीरात प्रवेश होत आहे. समुद्राविषयी सर्वसाधारण असंवेदनशीलता, मोठय़ा प्रमाणातील प्रदूषण आणि मानवी अतिक्रमणे असूनही ही समुद्री जैवविविधता अजूनही तग धरून आहे. विकासयोजना, हवामान बदल, प्रदूषण, विशेषत: मायक्रोप्लास्टिकचा प्राण्यांत होणारा संचय या बाबींकडे निदान आजच्या ‘जागतिक जैवविविधता दिनानिमित्ता’ने तरी आपण डोळसपणे लक्ष दिले पाहिजे.

हर्षल कर्वे, मराठी विज्ञान परिषद

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal marine biodiversity of mumbai amy
First published on: 22-05-2023 at 01:05 IST