कुतूहल : सागरी अन्नसाखळी व अन्नजाळे

सागरी परिसंस्थेत ‘उत्पादक ते भक्षक’ या आंतरक्रिया वेगळय़ा तऱ्हेच्या असतात. येथील जैवभार (बायोमास) पिरामिड उलटा असतो.

kutuhal sea beach

डॉ. नंदिनी विनय देशमुख

सागरी परिसंस्थेत ‘उत्पादक ते भक्षक’ या आंतरक्रिया वेगळय़ा तऱ्हेच्या असतात. येथील जैवभार (बायोमास) पिरामिड उलटा असतो. कारण प्राथमिक उत्पादकांपेक्षा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या भक्षकांचा  जैवभार खूप जास्त असतो. समुद्रातील प्राथमिक उत्पादक म्हणजेच वेगाने प्रजनन करून वाढणारे वनस्पती प्लवक! त्यांच्यापासून होणारे उत्पादन जमिनीवरच्या प्राथमिक उत्पादनापेक्षा खूप जास्त प्रमाणात असते. तरीदेखील या वनस्पती प्लवकांवर आपल्या अन्नाकरिता गुजराण करणारे प्राणी प्लवक अधिक संख्येने आढळतात. या प्राणी प्लवकांवर समुद्रातील विविध अन्नसाखळय़ा आणि अन्नजाळी अवलंबून असतात. सागरी परिसंस्थेतील प्राणी प्लवक हे  प्राथमिक भक्षक असून त्यांच्यावर तग धरणारे द्वितीय भक्षक समुद्रात वेगवेगळय़ा स्वरूपात आढळतात.

जे वनस्पती प्लवक खाल्ले जाण्याअगोदरच जीवनक्रिया बंद पडून समुद्र तळाशी जातात, त्यांच्याकरवी प्रतिवर्षी दोन अब्ज टन कार्बन अडकवला जातो. त्याचप्रमाणे या वनस्पती प्लवकांद्वारे पृथ्वीतलावरचा अर्धा ऑक्सिजन समुद्र उत्पन्न करतो. शिवाय वातावरणात साठणारा कार्बन डायऑक्साइड समुद्राकडून शोषला जातो. वनस्पती प्लवकांवर प्राणी प्लवक अवलंबून असतात. यामध्ये काही एकपेशीय जीव, काही संधिपाद जसे कोपेपोड, क्रील, माशांची पिल्ले, डिंबके तसेच नळ, माकुळ, शेवंड, खेकडे, कंटकीचर्मी यांची डिंबके हे प्राथमिक भक्षक असतात. कांदळवन परिसर अशा लहान जलचरांचा अधिवास असतो. त्यांची ही पाळणाघरे आपण नष्ट करीत राहतो. ज्या ज्या वेळी कांदळवनांचा नाश होतो त्या त्या वेळी सागरी अन्नसाखळी आणि पर्यायाने अन्नजाळे विस्कळीत होतेच, परंतु भविष्यातील सागरी प्रजातीदेखील नष्ट होतात.

छोटय़ा शाकाहारी प्राणी प्लवकांना मोठे मांसाहारी प्राणी जीव मटकावून टाकतात. वनस्पती प्लवक आणि शाकाहारी प्राणी प्लवक हे अनुक्रमे समुद्रातील पहिली आणि दुसरी पोषण पातळी तयार करतात, तर  तिसऱ्या  पोषण पातळीत  मांसाहारी प्राणी प्लवक येतात.  चौथ्या पोषण पातळीत भक्षक मासे, समुद्री सस्तन प्राणी, समुद्रावर अवलंबून असणारे पक्षी, असे मोठे प्राणी असतात. विविध जिवाणू सागरी जलात विघटक म्हणून कार्यरत असतात. समुद्रातील कोणतीही अन्नसाखळी साधी सरळ नसून ती क्लिष्ट अन्नजाळय़ाच्या स्वरूपात असते. माणसाच्या पर्यावरणाची हानी करणाऱ्या वर्तनामुळे सागरी अन्नसाखळीची हानी होते. असेच होत राहिल्यास मानवाला त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतील.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 00:02 IST
Next Story
कुतूहल : सागरी परिसंस्था
Exit mobile version