मोहरीएवढा चिमुकला मानवी गर्भ मातेच्या पोटातील गर्भजलात वाढतो. पण नंतर जमेल तेव्हा पाण्याकडे परतण्याची त्याची ओढ राहतेच. करमणूक म्हणून पोहणे, गरजपोटी मासे पकडणे, साहसापोटी, व्यापारासाठी नद्या, समुद्रातून घरापासून अधिकाधिक दूर जाणे सुरूच राहते. यातूनच माणूस दर्यावर्दी झाला. भारताला नौकानयनाचा हजारो वर्षांचा इतिहास आहे.
कोची येथे बांधलेली भारताची सर्वात मोठी विमानवाहू नौका, आयएनएस विक्रांतचे लोकार्पण झाले. या आत्मनिर्भरतेची बीजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केवळ २५ वर्षांचे असताना नौकानयनाचे व्यापारी, आर्थिक, आरमारी महत्त्व ओळखून पेरली. ते नौकाबांधणी आणि बंदरांचा विकास करू लागले. योग्य माणसे पारखून त्यांना जबाबदारी, निधी आणि स्वातंत्र्य देऊन महाराजांनी ब्रिटिश, पोर्तुगीज, सिद्धींवर जरब बसेल, असे जलदुर्ग व नौदल उभारले. समुद्राचे, वाऱ्यांचे, नक्षत्रांचे, सागरी युद्धशास्त्राचे सखोल ज्ञान स्वत: मिळवलेच शिवाय आपल्या सहकाऱ्यांनाही दिले. शिवकालीन मराठीत नाविक भांडय़ांसाठी (नौकांसाठी) तराफे, होडय़ा, गुराबे, शिबाडे, गलबते, मचवे, असे शब्द आहेत. ते अर्थातच नाविक व्यवहारांमुळेच रुळले आहेत. गुराब या शिडे आणि डोलकाठय़ायुक्त मोठी बोटीची वाहतूक क्षमता ३०० टनांपर्यंत असे. ती सुमारे १५० सैनिक आणि सात-आठ तोफाही वाहून नेई. शिबाड ही एका शिडाची, एका डोलकाठीची नाव युद्धाकाळात तोफा बसवून सैनिकी वापरासाठी, तर शांतताकाळात मालवाहतुकीस उपयोगी पडत असे. गलबते, मचवे, होडय़ा आकाराने व क्षमतेने लहान, पण शीघ्रगतीने वल्हवण्यायोग्य असत.
सम्राट चंद्रगुप्तांच्या मौर्यकालातील सैन्यात आरमाराला महत्त्व होते. समुद्रावरील चाच्यांचा बंदोबस्त, सागरसीमा सुरक्षित राखणे, समुद्रात उघडणाऱ्या नदीमुखांचे रक्षण अशी कामे आरमार करत असे. जवळच्या श्रीलंकेपासून ते दूरच्या इजिप्त, सीरियापर्यंतही मौर्यकालीन जहाजांची ये-जा चाले. तमिळनाडूत चोला, चेरा, पांडय़ा ही अतिप्राचीन शिवोपासक राजघराणी साधारण ख्रिस्तनंतर तिसऱ्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत कारभार करत होती. श्रीलंका, आफ्रिका, रोम, ग्रीसपर्यंत त्यांचा मसाल्याचे पदार्थ आणि माणिकरत्नांचा व्यापार चाले. ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांपासून सिंधू खोऱ्यातील हिंदीू मेसोपोटेमियापर्यंत तसेच पूर्वेला थायलंडपर्यंत व्यापारउदीम केला जात असे. ४५०० वर्षांपूर्वीची लोथल ही जगातील पहिली गोदी सिंधमधील आहे.
‘जयेम सं युधि स्पृध:’ हे आयएनएस विक्रांतचे ब्रीदवाक्य ऋग्वेदसंहिता प्रथम मंडल सूक्त ८ आणि नौसेनेचे ब्रीदवाक्य ‘शं नो वरुण:’ तैत्तिरीय उपनिषदातील आहे. ४००० वर्षांपूर्वीच्या अथर्ववेदात आणि त्याहीपूर्वीच्या ऋग्वेदात मोती, समुद्रसंपत्ती, शंभर वल्ह्यांच्या जहाजांची वर्णने आहेत. नंतर समुद्रप्रवास वज्र्य असा संकेत रूढ झाला आणि आपल्या प्रगतीत बराच काळ अडथळा आला.
नारायण वाडदेकर ,मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org