भूमध्य समुद्र (मेडिटेरियन सी) हा युरोप, आफ्रिका व आशिया या खंडांनी वेढलेला एक आंतर्देशीय समुद्र आहे. मार्मारा समुद्र व काळा समुद्र यांचाही भूमध्य समुद्रात समावेश केला जातो. हा समुद्र जिब्राल्टर सामुद्रधुनीने अटलांटिक महासागराशी, दार्दानेल्स आणि बॉस्फोरस सामुद्रधुनीने अनुक्रमे मार्माराशी व काळय़ा समुद्राशी तर मानवनिर्मित सुएझ कालव्याने तांबडय़ा समुद्राशी व पर्यायाने हिंदी महासागराशी जोडलेला आहे. या तिन्ही सागरी मार्गाना दळणवळण, व्यापार व लष्करीदृष्टय़ा अनन्यसाधारण महत्त्व आहे.
या समुद्राचा किनारी भाग सलग नसल्याने कमी-अधिक रुंदीचे पुष्कळ सागरी भाग निर्माण झालेले असून त्यांना वेगवेगळी नावे आहेत. तसेच यामध्ये अनेक आखाते व उपसागर आहेत. पश्चिमेकडील सागरी भागातील पाणी थंड व गोडे असते. लिआँचे आखात हा या सागराचा अतिथंड व दाट धुक्याचा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. तर लिबियाच्या किनारी भागात सिद्राच्या आखातात सर्वाधिक तापमान आढळते.
तांबडा समुद्र (रेड सी) हा पॅसिफिक व अटलांटिक या महासागरांच्या खालोखाल जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा महासागर आहे. कधी कधी पाण्याचा विस्तृत पृष्ठभाग हा शैवालाच्या मृत बहराने आच्छादलेला असतो, त्यामुळे लांबून समुद्राच्या पाण्याचा रंग गहिऱ्या निळय़ा, हिरव्या छटांऐवजी तांबूस तपकिरी दिसतो. म्हणूनच त्याला ‘तांबडा समुद्र’ म्हणतात. या समुद्राच्या पूर्वेस अरबस्तानचे द्वीपकल्प आणि पश्चिमेस ईशान्य आफ्रिका असून एडनच्या आखाताने तो अरबी समुद्रास जोडलेला आहे. ओम एल केतेफ, झूला व दोरवना हे इथले प्रमुख उपसागर आहेत. त्यामध्ये अनेक बेटे असून काही बेटे खडकाळ आहेत. त्याच्या दक्षिणेस जागृत ज्वालामुखींचा समूह आहे. सुएझ, अकाबा ही आखाते आहेत. तांबडय़ा समुद्रातून विविध प्रकारची खनिज संपत्ती मिळते. धातुयुक्त साठे द्रवरूप असल्याने ते तेलाप्रमाणे नळांनी पृष्ठभागावर आणणे शक्य आहे. या समुद्राच्या तळाशी मौल्यवान जड धातूंच्या (हेवी मेटल्स) ऑक्साईड्सचे ९ ते १८ मीटर जाडीचे रूपांतरित खडकांचे थर आहेत. या समुद्रात १९५० मीटरच्या खाली अनेक गरम व खाऱ्या पाण्याचे साठे आहेत. तांबडय़ा समुद्राच्या प्रदेशात पर्जन्यमान अतिशय कमी आहे. या समुद्रास एकही नदी येऊन मिळत नाही. परंतु एडनच्या आखातातून सामुद्रधुनीमार्गे पाणी आत येते. जलवाहतुकीस हा समुद्र अवघड व धोकादायक आहे. त्यामुळे नैसर्गिक बंदरे कमी असली तरी तांबडय़ा समुद्राच्या किनारपट्टीवर महत्त्वाची मानवनिर्मित बंदरे आणि शहरे आहेत.
प्राचार्य डॉ. किशोर पवार ,मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org