पहिल्या महायुद्धाचा शेवट नुकताच झाला होता. ब्रिटिश साम्राज्य भारतातला सगळा व्यापार आपल्या मक्तेदारीत राहावा म्हणून भारतीय व्यापार-उद्योगांना दडपून टाकण्याचे धोरण राबवीत होते. जमशेटजी टाटा यांनी सुरू केलेली ‘टाटा लेन’ (१८९४) आणि चिदम्बरम पिलाई यांची ‘स्वदेशी शिपिंग कंपनी’ (१९०६) या दोन कंपन्या उभारण्याचे प्रयत्न तेव्हाच्या प्रस्थापित ‘पेनिनशुलर अँड ओरिएंटल’ आणि ‘ब्रिटिश इंडिया’ या दोन कंपन्यांच्या मदतीने ब्रिटिश सरकारने अगदी हीन दर्जाला उतरून हाणून पाडले होते. १९०७ साली ज्योतिंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेली ‘बेंगाल स्टीमशिप’ ही कंपनीदेखील ब्रिटिश इंडिया कंपनीने तीन वर्षांत गिळंकृत केली. अशा परिस्थितीतही नरोत्तम मोरारजी आणि वालचंद हिराचंद या दोन व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा भारतीय जहाज कंपनी प्रस्थापित करण्याचे स्वप्न पाहिले.
१९१९ साली वालचंद हिराचंद दिल्लीहून मुंबईला येत असताना त्यांची वॉटसन नामक एका इंजिनीअरशी गाठ पडली. या भेटीतून त्यांना तेव्हाचे संस्थानिक महाराजा माधवराव सिंदिया यांचे एक जहाज विकाऊ असल्याचे समजले. मूळ कॅनेडियन पॅसिफिक लाइनचे हे जहाज महाराजा सिंदिया यांनी विकत घेऊन एक हॉस्पिटल शिप म्हणून ब्रिटिश सरकारला युद्ध काळात दिले होते. युद्ध समाप्तीनंतर हे जहाज विकण्यासाठी काढले होते. याचे नाव होते ‘एस. एस. लॉयल्टी’. अवघ्या दोन महिन्यांमध्ये वालचंद हिराचंद आणि नरोत्तम मोरारजी या उद्योजकाने ‘सिंदिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी’ स्थापन केली आणि ५ एप्रिल १९१९ या दिवशी एस. एस. लॉयल्टी’ हे प्रवासी जहाज युरोपकडे रवाना झाले. पुढची २८ वर्षे ‘सिंदिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी’ला ब्रिटिशांकडून सतत विरोध होत राहिला, पण त्यांनी त्याला मोठय़ा धैर्याने तोंड दिले. यामुळे या दिवसाला भारतीय जलवाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.




१९६४ साली ५ एप्रिल हा भारताचा ‘राष्ट्रीय सागरी दिन’ म्हणून जाहीर करण्यात आला आणि तेव्हापासून दरवर्षी तो साजरा केला जातो. या दिवशी नौवहन क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला ‘वरुण पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाते.
कॅप्टन सुनील सुळे,मराठी विज्ञान परिषद