scorecardresearch

कुतूहल : निसर्ग अभ्यासक होण्यासाठी..

निसर्गप्रेमी आणि निसर्गतज्ज्ञ यात थोडा फरक आहे. निसर्गप्रेमी होण्यासाठी लौकिक अर्थाने ठरावीक शिक्षण घेणे अनिवार्य नाही.

कुतूहल : निसर्ग अभ्यासक होण्यासाठी..

डॉ. नंदिनी वि. देशमुख

निसर्गप्रेमी आणि निसर्गतज्ज्ञ यात थोडा फरक आहे. निसर्गप्रेमी होण्यासाठी लौकिक अर्थाने ठरावीक शिक्षण घेणे अनिवार्य नाही. मात्र लहान वयापासून निसर्गाशी योग्य नाते जोडले गेले पाहिजे. याबाबतीत पालकांनी ठोस प्रयत्न करणे आवश्यक आहे. नाहीतर शहरात राहणाऱ्या बालकांना निसर्गाचा परिचय होतच नाही. निसर्गाविषयी विशेष संवेदना असल्याशिवाय निसर्गप्रेमी होता येत नाही. निसर्गप्रेमी हा केवळ निसर्गात गेल्यावरच कार्यरत होतो, असे नाही तर त्याच्या रोजच्या जगण्यात, वागण्या-बोलण्यात निसर्गाशी एकरूप होण्याची तळमळ असावी लागते.

निसर्गतज्ज्ञांचे मात्र निसर्गाशी संबंधित विषयांतील शिक्षण झाले असणे जरुरीचे आहे. निसर्गतज्ज्ञ होण्यासाठी जीवशास्त्र, रसायनशास्त्र, उत्क्रांतीशास्त्र, भूगोल हे विषय मुळात महत्त्वाचे आहेत. त्याचसोबत जुजबी गणित किंवा संख्याशास्त्र या ज्ञानशाखांची माहिती असणेही आवश्यक आहे. वनस्पती, प्राणी यांची ओळख, वर्गीकरण, पर्यावरणातील आंतरसंबंध यांची योग्य माहिती असणे, चांगल्या प्रकारे छायाचित्रण करून निरीक्षण करणे, वन्यजीव आणि वनस्पतींचे नमुने अभ्यासणे, त्यांच्या नोंदी करणे, नैसर्गिक परिसरात प्रयोग करण्याची क्षमता असणे, वन्य परिसरात वावरण्याची सवय असणे, शारीरिकदृष्टय़ा सक्षम असणे या सर्व बाबी निसर्गतज्ज्ञांसाठी गरजेच्या आहेत.

निसर्गात फिरून मिळवलेल्या माहितीच्या आधारे, उत्तम संशोधन करून अहवाल लेखन करण्याची क्षमता हवी. त्याचप्रमाणे शास्त्रीय शोधनिबंध लिहिणे, शाळा- महाविद्यालयांत सादरीकरण करणे, त्यासाठी लोकाभिमुख असणे आवश्यक आहे. ज्येष्ठ निसर्गतज्ज्ञांनी आपल्या कार्यालयात किंवा प्रयोगशाळेत कनिष्ठ सहकाऱ्यांकडून मिळवलेल्या माहितीचे संकलन करून त्यांना मार्गदर्शन करणे महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे नैसर्गिक साधन संपत्तीचे  संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी; वनस्पती आणि प्राणीमात्र जगवण्यासाठी त्यांना विशेष परिश्रम घ्यावे लागतात. म्हणून असे ज्येष्ठ निसर्गतज्ज्ञ जनता आणि शासन यांतील महत्त्वाचा दुवा ठरू शकतात. शासनाच्या निरनिराळय़ा विकास योजना राबवताना निसर्गाची हानी रोखण्यासाठी हेच शास्त्रज्ञ उपयुक्त असतात. त्यांना तशी प्रामाणिक दृष्टी मात्र हवी.

येत्या काही दशकांत निसर्गाच्या अभ्यासाला विशेष महत्त्व येईल. हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जाऊन आपल्याला आपली नैसर्गिक साधन संपदा वाचवायची असेल तर निसर्गाची जपणूक करणे हा अतिशय महत्त्वाचे ठरते. यासाठी निसर्ग संरक्षण आणि संवर्धनाची जाणीव असलेले शास्त्रज्ञ निर्माण झाले पाहिजेत. निसर्गाने नवतरुणांना उत्तम व्यवसाय संधी दिल्या आहेत, त्यासाठी मात्र त्यांना ही नवदृष्टी आवश्यक आहे.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या