scorecardresearch

कुतूहल : निसर्ग का वाचवला पाहिजे!

नैसर्गिक परिसंस्थांची स्थिती आणि मानवी आरोग्य यांचा अन्योन्य संबंध अनेकपरींचा आहे.

कुतूहल : निसर्ग का वाचवला पाहिजे!
संग्रहित छायाचित्र

डॉ. नंदिनी वि. देशमुख

नैसर्गिक परिसंस्थांची स्थिती आणि मानवी आरोग्य यांचा अन्योन्य संबंध अनेकपरींचा आहे. वरवर विचार केल्यास हे जाणवत नाही, मात्र अगदी मानवाच्या पोषणापासून ते रोगप्रतिकारक क्षमता निर्माण करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी हे नाते आढळून येते. कीटक, पक्षी आणि वटवाघळे यांच्या साहाय्यानेच जगभरात परागीभवन होत असते. ही प्रक्रिया झाली नाही तर मानवी आहारातील आवश्यक पोषणद्रव्यांचा आणि ऊर्जेचा पुरवठा सीमित होईल. अन्न-धान्य समस्या बिकट होईल. मत्स्यव्यवसाय लयास गेल्यास लक्षावधी मानवांचा प्रथिनयुक्त आहार नाहीसा किंवा नगण्य होईल. येणाऱ्या नव्या पिढय़ा कुपोषित होतील.

कांदळवनांची आणि इतर किनारपट्टीवर असणाऱ्या वनस्पतींची हानी झाल्यास वादळ आणि त्सुनामीसारख्या संकटांना तोंड देणे कठीण होईल. संशोधकांच्या मते जर कांदळवने नसती तर ओडिशासारख्या राज्यात चक्रीवादळाच्या वेळी तीनपट जास्त मृत्यू झाले असते. जगभरात नष्ट केली जात असलेली कांदळवने, किनारी परिसंस्था, पाणथळ जागा इत्यादीमुळे किनाऱ्यानजीक राहणाऱ्या मानवी वस्तीचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे.

शिकार करणे आणि अधिवासाची हानी यामुळे अनेक संसर्गजन्य रोगांचा प्रसार होत असतो. ब्राझीलमध्ये हे सिद्ध झाले आहे की, पनामा आणि अ‍ॅमेझॉन येथील सस्तन प्राण्यांच्या घटत चाललेल्या संख्येमुळे ‘चागास’ रोगासारख्या व्याधी सर्वदूर पसरत आहेत. जगभरातील घटत गेलेल्या वनसंपत्तीमुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढून हवामान बदलाचे घातक परिणाम आपल्याला आता सहन करावे लागतात. याशिवाय मानवी उपद्वय़ापामुळे हरितगृह वायूचे वाढणारे प्रमाण माणसावरच अतिउष्णता, संसर्गजन्य रोग, श्वसनरोग समस्या, हवा प्रदूषण, नैसर्गिक आपत्ती, पाण्याचा आणि अन्न-धान्याचा तुटवडा, अशा अनेक संकटांची मालिका निर्माण करीत आहे.

जनसामान्यांना परिसंस्थेतील नाजूक समतोलाची जाणीव नसल्याने आपल्याच पायावर आपणच धोंडा पाडून घेत आहोत. रासायनिक खतांचा वापर, जड धातूंचा आणि कीडनाशकांचा अन्नात होणारा संचय, जैवविविधतेची हेळसांड, विकासाच्या रेटय़ाखाली भरडणारा निसर्ग आपल्याला ही जाणीव पावलोपावली करून देत आहे. परंतु केवळ पैशाला महत्त्व दिल्यामुळे आणि निसर्गाला किती ओरबाडायचे याचे काही प्रमाण नसल्याने आज पृथ्वीवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

अ‍ॅमेझॉन आणि इंडोनेशिया येथे लागणाऱ्या (की लावल्या गेलेल्या?) आगींमुळे जगभरात हृदय आणि फुप्फुसविकाराचे रुग्ण वाढत आहेत. किरणोत्सारानंतर कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, त्याचबरोबर संसर्गजन्य जिवाणू आणि विषाणू मोठय़ा प्रमाणात निर्माण होत आहेत. त्यांना काबूत आणण्यासाठी आपल्याला अधिकाधिक प्रतिजैविके शोधून काढावी लागत आहेत. करोनासारख्या अनेक वैश्विक साथींची यापुढेही भीती राहणारच आहे. या साऱ्यावर एकच उपाय म्हणजे, निसर्ग वाचवला पाहिजे!

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या