देवराई हे निसर्गाचे अतिशय देखणे रूप तर आहेच, पण ती विज्ञानाची जिवंत चालती-बोलती रसायनविरहित प्रयोगशाळासुद्धा आहे. अनेक स्थानिक पुरातन वृक्ष, वेली, झुडपे, औषधी वनस्पती, निर्मळ पाण्याचा स्रोत, विविध कीटक, लहान-मोठे प्राणी, पक्षी यांनी ही परिसंस्था कायम सुरक्षित आणि गजबजलेली असते. आतमध्ये एखाद्या देवतेचे अस्तित्व म्हणून माणसास तेथे बंदी, ही अंधश्रद्धा असली तरी त्यातून विज्ञानाच्या या ज्ञानकोठाराचे संरक्षण आणि संवर्धन झाले आहे आणि म्हणूनच हजारो वर्षांचा हा निसर्गवारसा आजही शास्त्रज्ञांना खुणावत असतो.

देवरायांच्या या पहिल्या हाकेला प्रतिसाद देण्याचे श्रेय महाराष्ट्रातील डॉ. वा. द. वर्तक आणि डॉ. माधवराव गाडगीळ या परिसंस्था अभ्यासकांना जाते. ‘निसर्गाच्या भेटीला विज्ञान’ हे उद्दिष्ट समोर ठेवून या दोघांनी १९७२च्या आसपास पुण्याजवळील पानशेत धरणाच्या पुढे जो घाटमाथ्याचा भाग आहे, तेथील वेल्हे तालुक्यास भेट देण्याचे ठरविले. हा परिसर देवरायांनी समृद्ध होता, पण अडचण होती चांगल्या आणि वाहन जाऊ शकेल अशा रस्त्यांची, त्यामुळे या दोन शास्त्रज्ञांना या सर्व निसर्ग प्रयोगशाळा पायी हिंडाव्या लागणार होत्या. दोघांची यासाठी तयारी होती. त्यांनी त्या भागातील वन अधिकाऱ्याला भेटून, ‘अभ्यासासाठी या देवरायांना भेट देऊ द्या,’ अशी विनंती केली. पायी फिरायचे असल्यामुळे एखादा वाटाडय़ा देण्याचीही त्यांनी विनंती केली, ती मान्य झाली आणि वाटाडय़ाबरोबर त्यांचा देवराईचा प्रवास सुरू झाला.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
ग्रामविकासाची कहाणी
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

माधवराव आणि वर्तक एकेका गावात मुक्काम करून स्थानिकांकडून रात्री देवरायांची माहिती घेत व दिवसा त्यावर आधारित प्रत्यक्ष पाहणी करत. त्यानुसार या दोन शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रातील देवरायांची मोजणी करण्याचा प्रयत्न केला आणि ही संख्या ६००च्या घरात गेली. आज या संवेदनशील विषयावर अनेक शास्त्रज्ञांनी बहुमोल संशोधन केले आहे. निसर्गाच्या जवळ जाताना, त्यामधील वनस्पती, प्राणी आणि कीटकांचा खजिना शोधताना शास्त्रज्ञांना किती अडचणी येतात, त्यातून मार्ग कसा काढला जातो, स्थानिकांचे सहकार्य किती मोलाचे असते, याची माहिती हे दोन शास्त्रज्ञ त्यांच्या देवराई शोधयात्रेतून देतात. निसर्गाशी जोडलेले संशोधन वैज्ञानिक पद्धतीने कसे करायचे, याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे यांनी या देवराई शोधयात्रेचे सुंदर वर्णन त्यांच्या ‘डॉ. माधवराव गाडगीळ’ या पुस्तकात केले आहे.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org