डॉ. नंदिनी वि. देशमुख
संयुक्त राष्ट्राने १९९४ मध्ये त्यांच्या सर्वसाधारण सभेत दरवर्षी १६ सप्टेंबरला ‘जागतिक ओझोन दिन’ साजरा करायचा ठरवले, कारण याच दिवशी १९८७ मध्ये ‘मॉन्ट्रिअल करार’ करण्यात आला होता. अनेक देशांनी या करारावर तत्काळ सह्या केल्या होत्या. जे पदार्थ ओझोनच्या थराला भगदाड पाडत होते, त्यांच्या वापराबाबत फेरविचार करण्याबद्दल मतैक्य होऊन सर्वानी एकजुटीने येणारे संकट रोखायचे ठरवले होते. या घटनेला ३० वर्षे झाली, तेव्हा २०१७ मध्ये ओझोन थराला पडलेली छिद्रे बुजल्याची अतिशय सकारात्मक बाब समजली. आणि पुढची १०० वर्षे तरी ओझोन थर सुरक्षित राहील असे मानले जाऊ लागले. ओझोनविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी दिनांक १६ सप्टेंबरला जागतिक ओझोन दिन साजरा करण्याची प्रथा पडली.




ओझोनच्या थराला छिद्रे असतील तर अतिनील किरण पृथ्वीवर पोहोचून घातक परिणाम घडवून आणतात. त्यात वनस्पतीप्लवकाचे घटलेले उत्पादन आणि इतर सागरी प्राण्यांच्या वाढीच्या अवस्थांना धोका पोहोचतो. मात्र आता वाढत्या सागरी तापमानामुळे समुद्रच ओझोन नष्ट करणारे द्रव्य सोडतो असे लक्षात आले आहे. त्यामुळे अतिनील किरणांमुळे कर्करोगाचे वाढलेले प्रमाण, मोतिबिंदू, रोगप्रतिकार क्षमता कमी होणे असे धोके मानवालाही निर्माण होत आहेत. गेली काही दशके खोल समुद्रात क्लोरोफ्लुओरोकार्बन धीम्या गतीने साचत राहिले होते. मानवाने वातावरणात सोडलेली एरोसोल आणि रेफ्रीजेरन्ट पृष्ठभागावरील वातप्रवाहातून समुद्रात सरतेशेवटी शोषली जातातच.
हवामान बदलामुळे जसजसे सागराचे तापमान वाढत आहे, तशी ही रसायने सागरीजलातून निसटून ओझोन थराची हानी करत आहेत. जरी मॉन्ट्रिआल कराराप्रमाणे सर्व काळजी घेतली जात होती, तरी आता हे नवे संकट समोर येत आहे. २०७५ पर्यंत समुद्र जितके सीएफसीचे शोषण करेल त्यापेक्षा जास्त तो बाहेर फेकेल असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. हा बदल प्रथम उत्तर गोलार्धात होईल आणि तेथून हे विषारी वायू वातावरणात पुन्हा ओझोन रेणूंवर हल्ला करतील. १९१३ मध्ये फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स फॅब्री आणि हेनरी ब्युईसन यांनी शोधून काढलेल्या या ओझोनच्या छत्रीची काळजी घेणे अनिवार्य आहे. सध्याच्या बदलत्या परिस्थितीत ओझोनच्या थर टिकवायचा असेल तर महासागराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.